महिला कुस्तीपटुंवरील लैंगिक अत्याचाराविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनींनी मोर्चा काढला. मात्र, या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत शरद पवारांनी या प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी गुरुवारी (४ मे) ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना पाठिंबा म्हणून मोर्चा काढणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील महिलांशी केलेलं वर्तन अन्याय्य आहे. ते पाहून दुःख झालं आणि विचलित झालो. शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांनी केलेल्या क्रुरतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घालवं असं आवाहन करतो.”

“महिलांचं लैंगिक शोषण करणारा खुलेआम फिरत आहे”

कुस्तीपटू बजरंग पुनियाने ट्वीट करत म्हटलं, “दिल्ली विद्यापीठातील मुलींनी महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. महिलांचं लैंगिक शोषण करणारा खुलेआम फिरत आहे, मात्र पोलीस आरोपीला पकडण्याऐवजी पीडित महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देणाऱ्यांना ताब्यात घेत आहे. हे लज्जास्पद आहे.”

“पोलिसांकडून विद्यार्थीनींशी धक्काबुक्की”

महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिक म्हणाली, “दिल्लीतील विद्यार्थ्यीनींनी महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं. मात्र, पोलिसांनी या विद्यार्थीनींशी धक्काबुक्की केली आणि ताब्यात घेतलं. पोलिसांनी विद्यार्थीनींना धमक्या दिल्या आणि दडपशाही केली. मात्र, या विद्यार्थीनी त्यांची लढाई सुरूच ठेवतील.”

हेही वाचा : महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी बजरंग पुनियाचा गंभीर आरोप, म्हणाला, “आता ट्वीट…”

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल

दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोक्सो कलमाअंतर्गत एका गुन्हाचा समावेश आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on police action on solidarity protest of delhi university women wrestler pbs
Show comments