शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊन पक्षात उभी फूट पडली. यानंतर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता राज्यात काही ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आता तरी एकत्र यावं असे बॅनर लागलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गुरुवारी (६ जुलै) मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे विश्वासू अभिजीत पानसे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेल्याची चर्चा रंगली. आता याबाबत दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. याबाबत महाराष्ट्रात होर्डिंगही लागत आहेत, असं लक्षात आणून देत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार स्मित हास्य करत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.”
“एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी…”
यावेळी शरद पवारांनी अजित पवारांनी उल्लेख केलेल्या २०१९ च्या आमदारांच्या सह्यांच्या पत्रावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “एक गोष्ट खरी आहे की, २०१९ मध्ये काही लोकांनी त्यांच्या सह्यांचं एक पत्र दिलं होतं. त्यात पक्षाचं पुढील धोरण काय असावं, कुणाबरोबर युती करावी यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं म्हटलं. त्यावर मी बैठक बोलावं असं म्हटलं होतं. मात्र, नंतर पुढे निवडणूक आली आणि त्यावर काहीही चर्चा झाली नाही.”
व्हिडीओ पाहा :
“२०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल”
“मला पूर्ण विश्वास आहे की, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल. आज जे सत्तेत आहेत त्यांना लोक दूर करतील. राज्यातील विरोधी पक्षांविरोधात ज्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटं बोलावं लागलं, म्हणजे…”, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाचा हल्लाबोल
“त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल”
“जे महाराष्ट्रात सुरू आहे त्याबाबत मला आनंद आहे की, याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल. राज्यातील सत्तेत बदल होतील आणि जनता राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातात सत्ता देतील,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.