मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या चारही राज्यांचे निकाल समोर येत आहेत. याबाबत विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की तेलंगणात पहिल्यापासून असं चित्र दिसत होतं की ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्याच हाती सत्ता राहील. मात्र राहुल गांधी यांनी सभा घेतली त्यानंतर तिथली स्थिती बदलली. तेलंगणात परिवर्तन झालं आहे. मोदींची जादू कायम आहे का? या प्रश्नावरही शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“दोन ठिकाणी भाजपाचं राज्य होतं. तिथे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. राजस्थानमध्ये काँग्रेस पाच वर्षे सत्तेवर होती. तिथे नव्या लोकांना संधी देऊ असं राजस्थानच्या लोकांना वाटलं. त्याला साजेसे आत्ताचे कल दिसत आहेत. हे कल आहेत निकाल नाहीत हे लक्षात घ्या. ” असं शरद पवार म्हणाले
देशात मोदींची जादू कायम आहे असं वाटतं का?
देशात मोदींची जादू कायम आहे असं वाटतं का? हे विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “मी राजस्थान काय किंवा कुठल्याही राज्यात गेलो नव्हतो. त्यामुळे तिथे काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी होती का हे मी सांगू शकत नाही. तसंच इंडिया आघाडीवरही या निकालांचा काही परिणाम होईल असं मला मुळीच वाटत नाही. मोदींची जादू कायम आहे का? हे आपल्याला संध्याकाळी सहानंतर समजू शकणार आहे. आत्ता मोजणी सुरु आहे. त्यामुळे आत्ताच काही म्हणणं घाईचं होईल.” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
EVM बाबत काय म्हणाले शरद पवार?
EVM बाबत काही चर्चा कानावर आली आहे. मात्र त्याबाबत खरी माहिती, संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्याशिवाय मी यावर बोलणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक होण्याआधीही चर्चा झाली होती. मात्र आत्ता जोपर्यंत संपूर्ण माहिती हाती येत नाही तोपर्यंत मी यावर बोलणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षण हे समाजाला मिळालं पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्यात सगळ्यांचं एकमत झालं. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या ताटातलं काढून द्या अशी भूमिका कुणाचीही नाही. मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अन्य घटकांच्या हितांची जपणूक करु आणि मराठा समाजाला न्याय देऊ असा निर्णय केंद्राने घ्यावा असा आग्रह आम्ही केला असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.