पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील आजच्या बैठकीची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच राष्ट्रीय पातळीवर देखील ही भेट चर्चेत होती. भाजपाविरोधी आघाडीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर ही शक्यता खरी ठरली असून फक्त आघाडीविषयीच नाही, तर २०२४च्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

“पश्चिम बंगाल-महाराष्ट्राचे जुने संबंध”

बैठकीनंतर शरद पवारांनी ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्याविषयी त्यांचं अभिनंदन केलं. “ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्याच्या मागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे. उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.

“भाजपाला पर्याय द्यायला हवा”

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. “आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत!

कुणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही

दरम्यान, ममता बॅनर्जी भाजपाविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसला वगण्याच्या भूमिकेत असताना शरद पवारांनी मात्र त्यावर वेगळी भूमिका घेतली आहे. “काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर त्यांचं स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणं हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचं नेतृत्व वगैरे ही दुय्यम बाब आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं”, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

Story img Loader