संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती. त्यानंतर ओम बिर्लांच्या अध्यक्षेत पुन्हा कामकाज सुरु झालं. या सगळ्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक पोस्ट केली आहे.
काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्ट?
देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून २ अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून एकच गोंधळ उडवला, ज्यामुळे लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावा लागला.
देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी असणे म्हणजे केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांची देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते आणि पुन्हा सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते, सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा..!
नेमकं काय घडलं?
दोन तरुण सभागृहात धावत असताना खासदारांनी त्यांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला. त्यांनी स्मोक कॅनचा वापर केला असावा असं सांगितलं जात आहे. त्याचवेळी खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. मैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.