शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार देखील असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपासोबत सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव देखील एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे महाराष्ट्रासोबतच दिल्लीमधील घडामोडींना देखील वेग आला आहे. अमित शाह यांनी जे. पी. नड्डा यांच्यासोबत तातडीने चर्चा केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. मात्र, सरकार पडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या कथित बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडून सरकारच कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडीतील इतर पक्षांची भूमिका देखील महत्त्वाची ठरू लागली आहे. एकीकडे काँग्रेसनं हे मळभ लवकरच दूर होईल, अशी प्रतिक्रिया दिलेली असताना शरद पवारांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नेतृत्वबदलाची गरज वाटत नाही”

“सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यातून काही ना काही मार्ग निघेल, असा मला विश्वास आहे. आत्तापर्यंत शिंदेंनी आम्हाला किंवा इतर कुणाला त्यांचा प्रस्ताव सांगितला नाही. पण तिन्ही पक्षांमधल्या चर्चेनुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यात बदल करणं हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यासंदर्भात शिवसेनेचं नेतृत्व जे काही निर्णय घेईल, त्यात आम्ही असू. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर. २०१९ साली राज्यात सरकार स्थापन होण्याच्या वेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत गेला होता. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे काय करणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

दरम्यान, यासंदर्भात पत्रकार परिषदेत माध्यमांनी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “काहीतरी व्यवस्थित प्रश्न तरी विचारा. काहीही प्रश्न विचाराल का? राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबतच का जाईल? विरोधात देखील बसू शकते”, असं म्हणत पवारांनी ही शक्यता स्वीकारली जरी नसली, तरी पूर्णपणे नाकारली देखील नाही. तसेच, हाच प्रश्न पत्रकारांनी पुन्हा विचारला असता त्यावर फक्त हसून पवारांनी उत्तर देणं टाळल्यामुळे यासंदर्भातल्या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे.

Story img Loader