Marathi Sahitya Sammelan 2025 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात झाली. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. तसेच महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय अन् सांस्कृतिक संबंध असल्याचंही शरद पवार यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार काय म्हणाले?

“मराठी माणूस केवळ महाराष्ट्रातच नाही तर मराठी माणसांनी अटकेपार झेंडा फडकवला आहे. दिल्ली, हरियाणा, इंदोर, गुजरातमधील अनेक शहरात देखील मराठी माणूस दिसतो. मराठी साहित्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आज यमुनेच्या तिरावर जमलो याचा मला आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत दुसऱ्यांदा होत आहे. या साहित्य संमेलनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहिले याचा मला आनंद आहे. हे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातील साहित्यिक आणि रसिक या सर्वांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा केला आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याबद्दल मी त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“१९५४ साली पहिल्यांदा दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं. तेव्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्धघाटन केलं होतं. जवाहरलाल नेहरू यांनी जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्धाटन केलं होतं. त्यानंतर ७० वर्षांनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्धघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे. मी माझ्या एका भाषणात एकदा एक खंत व्यक्त केली होती. आतापर्यंत एवढी संमेलने झाली पण फक्त चारच महिलांना संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. पण यावेळी एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा मान मिळाला याचा मला आनंद आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

“…अन्यथा वेगळा इतिहास घडला असता”

“दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नातं आहे. ११ व्या शतकापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत. एक पंतप्रधान मला नेहमी सांगायचे की तुम्ही लोकांनी एक गोष्ट ठीक केली नाही. मी त्यांना म्हटलं काय ठीक केलं नाही? ते म्हणाले, मराठे आले आणि दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्ली हातात घेतली. पण दिल्लीला आपल्या हातात ठेवण्याऐवजी पाणीपतला गेले. जाण्याची काही आवश्यकता नव्हती, अन्यथा वेगळा इतिहास घडला असता. पण झालं ते झालं, तो इतिहास आपण विसरु शकत नाहीत. आज साहित्याच्या क्षेत्रात मराठी माणसांनी मोठं योगदान दिलं. त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेली. वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्यासह आदी मराठी लेखकांना जागतिक पुरस्काराने सान्मानित करण्यात आलं. त्यामाध्यमातून मराठी भाषेची पताका देशभर फडकत राहिली”, असं शरद पवार म्हणाले.