गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्यापाठोपाठ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करण्याची मागणी लावून धरली. या खासदारांनी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली दोन्ही सभागृहांमध्ये मिळून आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या १४३ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
“हा सभागृहाचा अधिकार आहे”
“लोकसभेत ज्या तरुणांनी घुसखोरी केली, ते कसे लोकसभेत आले? कुणाच्या पासवर आले? यावर सरकारकडून निवेदन होण्याची आवश्यकता होती. सभागृहाचा तो अधिकार आहे. आम्ही ते निवेदन मागितलं. पण ते देण्याची सरकारची तयारी नव्हती. आम्ही आग्रह केला, तर त्याचा परिणाम निलंबनात झाला. आजपर्यंत हा प्रकार सदनात घडला नाही. विधानसभा किंवा संसदेत कार्यरत होऊन मला ५६ वर्षं झाली. मी असा प्रकार कधीच पाहिला नाही. विरोधकांच्याही काही जबाबदाऱ्या असतात. विरोधकांकडे दुर्लक्ष करून सरकार आपल्याच पद्धतीने कारभार करू पाहात आहे. पण देशाची जनता हे सगळं पाहात आहे. याची जबरदस्त किंमत योग्य वेळी देशाची जनता वसूल करेल याचा मला विश्वास आहे”, असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.
“एवढ्या खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही”
“विधेयकांवर चर्चा होणं हेच त्यांना आवडत नाही. कोणतंही विधेयक किंवा कायदा सभागृहासमोर येतो आणि विरोधकांना तुम्ही भूमिका मांडण्याची संधीच न देता ते पारित करणार असाल तर ते योग्य नाही. संसदीय लोकशाहीचा हा अपमान आहे. जे काही झालं, ते संसदेच्या इतिहासात आजपर्यंत घडलं नाही. ते काम या सरकारनं केलं आहे. मला विश्वास आहे की देशातली जनता योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल”, असंही शरद पवार म्हणाले.
एका दिवसात सर्वाधिक ७८ विरोधी खासदार निलंबित: हे का घडले, संसदेचे नियम काय सांगतात?
“१५० खासदारांचं निलंबन केलं, ही काय चांगली गोष्ट आहे का? संवाद ठेवायला हवा. लोकशाहीत संवादाशिवाय सरकार चालत नाही”, असंही ते म्हणाले.
कल्याण बॅनर्जींचं वर्तन योग्य की अयोग्य?
दरम्यान, निलंबनानंतर काही खासदार संसदेच्या आवारात आंदोलन करत असताना तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून खुद्द धनखड यांनी “हा जाट समाजाचा अवमान आहे”, असं म्हणत यावर नाराजी व्यक्त केली. यावरून शरद पवारांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे.
“सभागृहाबाहेर कुणी काही केलं तर…”
“ते (नक्कल करणारे सदस्य) सभागृहात होते का? सभागृहाच्या बाहेर ते घडलं. समजा मी इथे आत्ता काहीतरी केलं, तर त्याची जबाबदारी माझ्या पक्षावर किंवा नेत्यावर असेल का? सभागृहाबाहेर कुणी काही केलं तर त्यावर फारतर चर्चा होऊ शकते. पण हे प्रकरण इथपर्यंत घेऊन जाणं अयोग्य आहे. माझ्याविरोधात काही घडलं तर त्यावर ‘मी मराठा आहे, शेतकरी आहे. हा मराठ्यांचा, शेतकऱ्यांचा अपमान आहे’, असं मी म्हणणं चुकीचं आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी उपराष्ट्रपतींच्या विधानावर नापसंती व्यक्त केली.