सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, शिंदे यांची डोकेदुखी ठरलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी भाष्य न करता त्यांच्या उमेदवारीबद्दल दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी थेट पवार यांच्यावर प्रखर टीकास्त्र सोडले आहे. मात्र तरीही पवार यांनी आंबेडकरांविषयी भाष्य न करता मौन बाळगल्याने, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा बनला आहे.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर भाजपने लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या रूपाने मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे स्वत: इथे उमेदवार आहेत. यामुळे तिरंगी लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी जास्त डोकेदुखीची ठरली आहे. आंबेडकर हे काँग्रेसची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता अधिक आहे. आंबेडकर हे जेवढी मते घेतील, तेवढा धोका शिंदे यांना संभवतो, असे म्हटले जाते. या निवडणुकीत उतरल्यानंतर प्रकाश आंबेडकर सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडण्याची संधी सोडत नाहीत. किंबहुना त्यांच्याकडून पवार यांच्यावर होणारी टीका अधिक विखारी आहे. पवार हे आंबेडकर यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सोलापुरात त्यांनी दोन-तीन सभा घेतल्या. परंतु एकाही सभेत त्यांनी आंबेडकर यांच्या टीकेचा समाचार घेतला नाही. राजेंद्र चौकातील प्रचारसभेत बोलताना पवार यांनी आपल्या भाषणात आंबेडकर यांचा उल्लेख टाळला, त्या वेळी त्यांना एक चिठ्ठी गेली. त्यावर पवार यांनी भाष्य करताना, सोलापूर आणि प्रकाश आंबेडकर यांचा काय संबंध? मी कधीही त्यांना सोलापुरात पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी विनाकारण शब्द खर्ची कशासाठी घालायचे, असे सांगत आंबेडकर यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केले.