केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसससह देशभरातील २५ हून अधिक विरोधी पक्ष ‘इंडिया’ (आघाडी) या एका छताखाली एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएविरुद्ध इंडिया आघाडी असा सामना होणार आहे. आगामी निवडणुकीतही विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. भाजपासह एनडीएतील सर्वच पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागताना दिसतील. परंतु, विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे अद्याप ठरलेलं नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खऱगे यांच्या नावाची चर्चा चालू होती. परंतु, त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासह इंडिया आघाडीतल्या काही पक्षांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची इंडिया आघाडीकडून तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीची गेल्या महिन्यात दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीतल्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), द्रविड मुन्नेत्र कळघमसह अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. परंतु, शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी त्यास पाठिंबा दर्शवलेला नाही.
दरम्यान, शरद पवार यांनी काही वेळापूर्वी जुन्नर (पुणे) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल. त्यावर शरद पवार म्हणाले, आम्हाला कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करावा असं वाटत नाही. आम्हाला एखाद्याच्या चेहरा प्रोजेक्ट करून त्याच्या नावाने मतं मागावी असं आत्ता तरी अजिबात वाटत नाही. कारण आम्हाला खात्री आहे की, आगामी लोकसभा निवडणूक झाल्यावर आणि आम्हाला बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चितच देशाला चांगला पर्याय देऊ.
हे ही वाचा >> ‘ख्रिसमस ट्री प्रमाणे राम मंदिराची प्रतिकृतीही दुकानात ठेवा, नाहीतर…’, इंदूरच्या महापौरांची तंबी
शरद पवार म्हणाले मी तुम्हाला १९७७ चं उदाहरण देईन. १९७७ च्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा आधीच घोषित केला नव्हता. निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत ज्या पक्षाची लोकांनी निवड केली त्या पक्षाने मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. निवडणुकीला सामोरे जाताना कोणाचीही निवड केली नव्हती. किंवा मोरारजी देसाईंचा चेहरा प्रोजेक्ट केला नव्हता. तरीदेखील तेव्हा आम्ही निवडणूक जिंकलो. कारण तेव्हा लोकांमध्ये आणीबाणीविरोधात तीव्र भावना होत्या. त्या लक्षात घेऊन आम्ही मतं मागितली आणि लोकांनी मतं दिली. परिणामी आम्हाला कोणालाही प्रोजेक्ट करावं लागलं नाही. तशीच परिस्थिती आत्तादेखील आहे. आम्हाला कोणालाही प्रोजेक्ट करण्याची आवश्यकता नाही.