काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत यावर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची इंडी आघाडीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. इंडी आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यास पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्याने आघाडीतल्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील नाराज असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
इंडी अघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी जुनं उदाहरण दिलं. शरद पवार म्हणाले, “१९७७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी (आणीबाणीनंतर) विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळीदेखील असं म्हटलं जात होतं की, विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे ठरलं नाही. पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नाही तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील. परंतु, तसं झालं नाही. जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात. जनता सत्ताबदलाच्या मनःस्थितीत असतील तर काहीही होऊ शकतं.” इंडिया टूडेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ठाकरेंचा खरगेंना पाठिंबा?
इंडि आघाडीला निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे, असा मुद्दा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या आघाडीच्या बैठकीपूर्वी उपस्थित केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील आघाडीच्या बैठकीत हाच मुद्दा उपस्थित केला. तसेच त्यांनी पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी त्यांनी खरगेंचे नाव सुचवलं होतं. बैठकीत यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. उलट, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला पाठिंबा दर्शवला. आघाडीतल्या २८ घटक पक्षांपैकी १६ हून अधिक पक्षांनी खरगेंना पाठिंबा दिला असून यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.
नाराजीच्या चर्चांवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया
नाराजीच्या चर्चांवर नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या उमेदवारीबाबत नितीश कुमार म्हणाले, मी जरादेखील नाराज नाही. मी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की, ज्याला पंतप्रधान व्हायचं असेल त्याने व्हावं. माझीही इच्छा नव्हती. बैठकीत मी तेच सांगितलं आहे. मी कधीच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केलेलं नाही.