राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे, असं विधान शरद पवारांनी केलं.
संबंधित वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतील मुद्द्यांबाबत माहिती देताना शरद पवार म्हणाले, “भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जो विचार मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला, तोच विचार आमचा आहे. पण केवळ विचार करून उपयोग नाही, त्यावर पूर्ण क्षमतेनं काम करण्याची गरज आहे. काही राजकीय पक्ष असे आहेत, ज्यांची विचारधारा आमच्याबरोबर काम करण्याची आहे. त्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, त्यावर विरोधी पक्षनेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष केंद्रीत केलं तर मार्ग आणखी सोपा होईल.”
हेही वाचा- एकनाथ शिंदे घरी येऊन रडले, त्यादिवशी काय घडलं? आदित्य ठाकरेंनी सांगितला प्रसंग, म्हणाले…
“ही सुरुवात झाली आहे. यानंतर बाकीचे जे महत्त्वाचे विरोधी पक्ष आहेत, जसं की.. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा इतर विरोधी पक्ष ज्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही, अशा नेत्यांना भेटून त्यांना या प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,” असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं तीन शब्दात उत्तर, म्हणाले…
विशेष म्हणजे बुधवारी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी शरद पवारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शरद पवारांना काही कामानिमित्त दिल्लीत बैठकीस हजर राहता आलं नाही. त्यामुळे आज शरद पवारांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.