राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय नवीन भूमिका घेणार, हे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. आज शरद पवारांनी आपल्या भाषणातून विविध मुद्य्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले. ज्यामध्ये प्रामुख्याने, देशाची आर्थिकस्थिती, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक, धार्मिक वाद यांचा समावेश होता.
शरद पवार म्हणाले, “ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांकडून आपल्याला प्ररेणा मिळालेली आहे. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारधारेने काम करणं हे आपण आपलं सर्वप्रथम कर्तव्य मानतो. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रगतीशील पक्षाच्या रुपात काम करू इच्छिते. शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात, तर त्यांनी एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडली आहे आणि ती म्हणजे, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकून त्यांनी स्वाभिमानाचा परिचय दिला आहे. आज आपण एका ऐतिहासिक मैदानात दिल्लीच्या तालकटोरा मैदानात जमलेलो आहोत. याच ठिकाणाहून पेशव्यांनी दिल्लीच्या शासनाला आव्हान दिलं होतं. मला आनंद आहे की दिल्लीच्या तख्ताला जिथून आव्हान दिलं गेलं होतं, त्या ठिकाणी आज आपलं अधिवशेन आयोजित करण्यात आलेलं आहे.”
“ आपण आपल्या स्वातंत्र्याचं पंच्चाहत्तरवं वर्ष साजरं करत आहोत. या वर्षात देशाने काही संकटं आणि राजकीय चढउतार पाहिले. याच कालावधीत आपण हे देखील पाहिलं की आपले जे शेजारील राष्ट्र आहेत, श्रीलंका, बांग्लादेश या ठिकाणी आपण तानाशाही पाहीली. ज्याचा परिणाम तिथल्या सरकार, संसदीय लोकशाहीवर झाला. काही मोजक्या लोकांच्या हाती तिथली सत्ता गेली होती. मागील ७५ वर्षांत देशात अनेक बदल झाले, आपल्याला समजातील काही वर्गांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज भारत खाद्य,अन्न उत्पादनात केवळ आत्मनिर्भरच नाहीतर जगातील अनेक देशांची धान्याची जी गरज आहे ती भारतामधील शेतकरी भागवतो. आपल्या सर्वांना आपल्या शेतकऱ्यांबद्दल अभिमान आहे. परंतु, दुर्दैवाने आपण शेतकरी आत्महत्येच्या घटना देखील या देशात पाहतो. आपण पाहीलं आहे, की मागील वर्षी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात याच दिल्लीत शेतकऱ्यांनी ठिय्या देत आंदोलन केलं होतं. भारत सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्यास तयार नव्हतं. जगाने हे शेतकरी आंदोलन पाहीलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शेतकरी वर्ग आणि कृषी क्षेत्राच्या हिताचं रक्षण करते आणि सदैव करणार आहे. शेतकऱ्यांसाठी वारंवार लढण्याची वेळ आली तरी आपली तयारी असायला हवी.” असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
याचबरोबर, “ राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे आणि अखंडित राखण्यासोबतच गतीशील विकासाची आज आवश्यकता आहे. काही सांप्रदायिक घटक सातत्याने समाजात जाती आणि धर्माच्या आधारावर विभाजन करू इच्छितात. हा सर्वांसाठी विशेषकरून महिला, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींसाठी एक फार मोठा धोका आहे. निवडून आल्यानंतर आपण राज्यघटना आणि सर्व धर्मांचा सन्मान करू, अशी शपथ घेतो. परंतु काहीजण शपथ घेतल्यानंतर हिंदुत्व, मंदिर किंवा मशीद सारख्या मुद्य्यांवर वादग्रस्त भूमिका घेऊन, अल्पसंख्यांकाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आजही करतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहीलं पाहिजे.” असं म्हणत शरद पवारांनी निशाणा साधला.
तर, “ आज देशात महागाई अभूतपूर्व पातळीवर पोहचली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, धान्य या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या करांमुळे सामान्य माणसांवर मोठा भार निर्माण झालेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया अभूतपूर्व घसरण अनुभवत आहे. याचे अर्थव्यवस्थेवर दुरोगामी परिणाम होऊ शकतात.” असं म्हणत शरद पवारांनी देशाच्या आर्थिक परिस्थतीवर बोट ठेवलं.