शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा केली जाणार असली तरी, संभाव्य बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जाते.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चच्रेला बळ मिळाले आहे.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची रणनीती आखली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे उपाध्यक्ष बनलेले यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. मात्र, त्यांनी भाजपविरोधी राजकीय आघाडीसंदर्भात बोलण्यास नकार दिला. मात्र, देशातील राजकीय स्थितीवर बैठकीत चर्चा केली जाईल, असे सिन्हा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘राष्ट्र मंच’ हे बिगरराजकीय व्यासपीठ असल्याने बैठकीला विरोधी पक्षनेत्यांसह बिगर राजकीय प्रतिनिधीही उपस्थित असतील. देशातील विविध मुद्दय़ांप्रमाणे राजकीय स्थितीवरही चर्चा होईल, असे यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या सहभागाविना?

काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटातील नेते कपिल सिबल यांनाही या बैठकीचे निमंत्रण असले तरी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते.

ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्याशक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार वा अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

१५ पक्षांना निमंत्रण

’माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे.

’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Story img Loader