Sharad Pawar : १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं. ते एक मत शरद पवारांना मिळालं होतं काय घडलं होतं? ज्यामुळे एका मताने ते सरकार पडलं हा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच सांगितला आहे. मतदान होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांचा एक खासदार आपण फोडला होता असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच १९९९ मध्ये नेमकं काय घडलं होतं ती परिस्थिती समोर आली आहे. गुरुवारी दिल्ली येथे निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी १९९९ ला अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडल्याचा किस्सा भाषणात सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात मी एक काम केले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हा आम्ही अविश्वास ठराव आणला होता. तो ठराव एकमताने मंजूरही झाला. ते एक मत मी मिळवले होते. ते कसे मिळवले हे सांगत नाही. ठराव मांडला, ठरावावर चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर मतदानापूर्वी काही वेळ असतो, त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो आणि परत आलो. यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने वेगळा निर्णय घेतला. ज्यानंतर एका मताने सरकार पडलं, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे.

शिवसेनेच्या नाराजीबाबत शरद पवार काय म्हणाले?

गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, “हे दोघं भेटणार.” मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचाराचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.”

बाळासाहेब ठाकरेंची ती आठवणही शरद पवारांनी सांगितली

“मी सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं. सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे आणि त्याचे उत्तरही आम्ही त्या पद्धतीतूनच द्यायचो. ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा. मला ते शरद बाबू म्हणत. फोनवर बाळासाहेब म्हणायचे “शरद बाबू मी येऊ भेटायला की तुम्ही येताय?” बोलावून घ्यायचे आणि भेटीत काल काय बोललो, काय लिहिलं याबद्दल यकिंचितही शल्य मनामध्ये कधी ठेवायचं नाहीत. अगत्य, आस्था, व्यक्तिगत सलोखा हा कधीही कमी झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेकांची नावे घेता येतील. हे सगळे या संसदीय इतिहासातील घटक आहेत आणि त्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न निलेशकुमार कुलकर्णी यांनी केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले.