नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यापासून नाराज असलेले संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते शरद यादव यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला होता. पटेलांचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद यादव यांनी ट्विट करून अहमद पटेल यांचे अभिनंदन केले. यादव यांनी ट्विटसोबत अहमद पटेल आणि त्यांचा फोटोही शेअर केला. मोठ्या अडथळ्यांचा सामना करून राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला भावी कारकिर्दीतही असेच यश मिळो, असा संदेश ट्विटमध्ये लिहला होता. त्यामुळे आता शरद यादव काँग्रेसमध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याच्या नितीशकुमारांच्या निर्णयावर शरद यादव सुरूवातीपासूनच नाराज आहेत. पक्षाचे अकरा यादव व सात मुस्लिम आमदारांमधूनही विरोधाचे सूर बाहेर पडत असल्याची चर्चा होती. बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शरद यादव यांनी दिली होती. शरद यादव यांचे निकटवर्तीय आणि दोन वेळा बिहार विधान परिषदेचे आमदार राहिलेले विजय वर्मांनी यादव हे महाआघाडीत कायम राहण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करतील असे संकेत दिले होते. मात्र, शरद यादव यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, त्यांच्या आजच्या ट्विटने पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला उधाण आले.

जो जीता वही सिकंदर; शिवसेनेने केले अहमद पटेलांचे अभिनंदन

गुजरातमधील राज्यसभेतील तीन जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. यात अमित शहा, स्मृती इराणी रिंगणात होते. तर तिसऱ्या जागेसाठी भाजपने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याविरोधात बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. अमित शहा, स्मृती इराणींचा विजय निश्चित असला तरी अहमद पटेल यांची वाट बिकट होती. काँग्रेस आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे पटेल यांचा पराभव होतो की काय अशी शक्यता होती. मात्र निवडणुकीत पटेल यांनी भाजपला धक्का देत विजय मिळवला. पटेल यांना ४४ मते पडली असून राजपूत यांना फक्त ३८ मतेच मिळाली.

नवीन पक्ष स्थापनेचा विचार नाही: शरद यादव

Story img Loader