बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी बिहारच्या ११ कोटी जनतेचा विश्वास गमावला आहे अशी खरमरीत टीका जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी केली आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेऊन खूप मोठी चूक केली त्यांचा हा निर्णय अत्यंत खेदजनक आणि विश्वासघातकी आहे. आमची महाआघाडी ५ वर्षांसाठी होती. मात्र नितीशकुमार यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे ११ कोटी जनतेचा विश्वास उडाला आहे, असंही यादव यांनी म्हटलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून राजद आणि जदयू यांच्यात जे महाभारत सुरू होतं त्यानंतर शरद यादव हेदेखील नितीशकुमार यांच्यावर नाराज होते. महाआघाडीतून बाहेर पडून शरद यादव वेगळा पक्ष स्थापन करतील अशीही चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या सगळ्या शक्यता शरद यादव यांनी खोडून काढल्या आहेत. आम्ही आमच्या आघाडीसोबत नातं तोडलेलं नाही, बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि आमचा उद्देश आजही तोच आहे आणि यापुढेही बिहारच्या जनतेचं कल्याण हाच आमचा उद्देश असणार आहे असंही शरद यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा जदयूचा जाहीरनामा आणि भाजपचा जाहीरनामा वेगवेगळा होता. मागील ७० वर्षात असं घडलं नाही ते बिहारमध्ये आता घडलं आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचा जाहीरनामा आता एकच झाला आहे. बिहारच्या जनतेची ही खूप मोठी फसवणूकच नितीशकुमार यांनी केली आहे असंही शरद यादव यांनी म्हटलं आहे. आता जनतेशी संवाद साधूनच मी सगळ्या राजकीय संकटातून मार्ग काढणार आहे असंही शरद यादव यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या आधीपासून जदयू आणि राजदच्या दोन्ही नेत्यांमध्ये अर्थात नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यात विस्तव जात नव्हता. नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्यानंतर या संघर्षाची धार अधिकच तीव्र झाली होती. या सगळ्याचा शेवट नितीशकुमारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यात झाला. तेव्हापासूनच जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव हे चांगलेच नाराज झाले होते. ते काँग्रेसमध्ये जाणार अशाही चर्चा रंगल्या आता मात्र त्यांनी ही नाराजी थेट नितीशकुमारांवर टीकेचे बाण चालवतच व्यक्त केली आहे.

Story img Loader