सावळ्या वर्णाच्या महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे जदयूचे सर्वोच्च नेते शरद यादव यांनी बुधवारी आपल्या वक्तव्याबद्दल राज्यसभेत दिलगिरी व्यक्त केली. राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटील यांनी हा मुद्दा उपस्थित करून शरद यादव यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना यादव यांनी घडल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आपण सुसंस्कृत समाजातून येत असल्याचे सभागृहात सांगितले.
वादग्रस्त विधानानंतर शरद यादव व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात राज्यसभेत शाब्दिक चकमक उडाली होती. दक्षिण भारतीय महिलांच्या सावळ्या वर्णावरून महिलांच्या शारीरिक सौंदर्यावर टिप्पणी करणाऱ्या यादव यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार दिल्याने स्मृती इराणी यांना संताप अनावर झाला होता. महिलांच्या रंगावरून तुम्ही टिप्पणी करणे योग्य नाही; तुम्ही आपले वक्तव्य मागे घ्या, अशी मागणी करणाऱ्या स्मृती इराणी यांना, तुम्ही कोण आहात हे मला ठाऊक आहे, असा टोमणा यादव यांनी मारला. यादव यांनी अप्रत्यक्षपणे स्मृती इराणी यांच्या ‘फिल्मी’ कामावर टिप्पणी केल्याने सभागृहात गोंधळ माजला होता.
माहिती व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वप्रथम शरद यादव यांनी महिलांच्या रंगावर केलेल्या विधानास आक्षेप घेतला होता. यादव यांनी विमा सुधारणा विधेयकादरम्यान रविशंकर प्रसाद यांच्याही वर्णावर टिप्पणी केली होती. भारतीयांची मानसिकता सांगताना ते म्हणाले होते की, आपले देव रविशंकर प्रसाद यांच्यासारखे सावळे आहेत. पण तरीही आपण (भारतीय) गोरी वधू हवी, अशी जाहिरात देतो. या विधानात आपला उल्लेख होता; पण मला हे विधान मान्य नाही, असे स्पष्टीकरण रविशंकर प्रसाद यांनी दिले. हे विधान शरद यादव यांनी मागे घ्यावे, अशी मागणी रविशंकर प्रसाद यांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा