आपल्यापैकी असा कोण आहे, ज्याने मुलींचा पाठलाग केलेला नाही. मुलीचा पाठलाग करणे आणि त्यांच्याकडे बघणे हा गुन्हा ठरवला, तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. हे उदगार आहेत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांचे. मंगळवारी संध्याकाळी महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयकावर लोकसभेत बोलताना शरद यादव यांनी हे वक्तव्य केले. महिलांवरील शारीरिक अत्याचार आणि बलात्काराच्या वाढलेल्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे विधेयक आणले असून, मंगळवारी त्याला लोकसभेत मंजुरी मिळाली. मात्र, या विधेयकावर झालेल्या चर्चेतून लोकप्रतिनिधी विधेयकाकडे आणि महिलावरील अत्याचाराकडे कशा पद्धतीने बघतात, हेदेखील स्पष्ट झाले.
विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर महिलांना खासगी नोकऱया मिळताना खूप अडचणी येतील. पुरुष अधिकारी महिलांना कामावर घेण्यास नकार देतील, असे मत त्यांनी मांडले. या नव्या कायद्यामुळे पुरुषांना एखाद्या महिलेकडून विनाकारण लटकवले जाऊ शकते, असे मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही पोलिसांना जास्त अधिकार द्या. पण, त्यासाठी असा नवा कायदा करायची काहीही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बलात्कार करणाऱयांना शिक्षा देण्यासाठी सध्याच्या कायद्यात कोणत्याच त्रुटी नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी खजुराहो आणि कोणार्कमधील नग्न शिल्पे आता झाकून ठेवावीत, अशी सूचना केली.

Story img Loader