सावळ्या वर्णाच्या महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे जदयूचे सर्वोच्च नेते शरद यादव व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात राज्यसभेत शाब्दिक चकमक उडाली. दक्षिण भारतीय महिलांच्या सावळ्या वर्णावरून महिलांच्या शारीरिक सौंदर्यावर टिप्पणी करणाऱ्या यादव यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार दिल्याने स्मृती इराणी यांना संताप अनावर झाला. महिलांच्या रंगावरून तुम्ही टिप्पणी करणे योग्य नाही; तुम्ही आपले वक्तव्य मागे घ्या, अशी मागणी करणाऱ्या स्मृती इराणी यांना, तुम्ही कोण आहात हे मला ठाऊक आहे, असा टोमणा यादव यांनी मारला. यादव यांनी अप्रत्यक्षपणे स्मृती इराणी यांच्या ‘फिल्मी’ कामावर टिप्पणी केल्याने सभागृहात गोंधळ माजला.
माहिती व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वप्रथम शरद यादव यांनी महिलांच्या रंगावर केलेल्या विधानास आक्षेप घेतला. यादव यांनी विमा सुधारणा विधेयकादरम्यान रविशंकर प्रसाद यांच्याही वर्णावर टिप्पणी केली होती. भारतीयांची मानसिकता सांगताना ते म्हणाले होते की, आपले देव रविशंकर प्रसाद यांच्यासारखे सावळे आहेत. पण तरीही आपण (भारतीय) गोरी वधू हवी, अशी जाहिरात देतो. या विधानात आपला उल्लेख होता; पण मला हे विधान मान्य नाही, असे स्पष्टीकरण रविशंकर प्रसाद यांनी दिले. हे विधान शरद यादव यांनी मागे घ्यावे, अशी मागणी रविशंकर प्रसाद यांनी केली.  
त्यावर यादव म्हणाले की, जमीन फाटली तरी मी माझे विधान मागे घेणार नाही. भारतात अनेक सावळ्या महिला आहेत. जगात त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मी कुणासोबतही यावर चर्चा करण्यास तयार आहे. यादव यांच्या हेकेखोर भूमिकेला इराणी यांनी विरोध केला. उपसभापती पी. जे.  कुरियन यांनी या मुद्दय़ावर चर्चा न करण्याचे आवाहन केले. मात्र  गोंधळ सुरूच होता. लोहिया वा गांधी यांनी महिलांविषयी काय वक्तव्ये केलीत याचा संदर्भ देऊन आपण चर्चेला तयार आहोत, असे आव्हान देत शरद यादव यांनी स्वत:च्या वक्तव्याचे समर्थन केले.

Story img Loader