गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी नकोच, या नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या भूमिकेचे जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव यांनी स्वागत केले आहे. सेन यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचेही यादव म्हणाले.
मोदी यांच्या नावाचा आग्रह भाजपने धरला नसता तर त्या पक्षासमवेत असलेली आमची युती तुटलीच नसती, असेही यादव यांनी म्हटले आहे. मोदी हे पंतप्रधानपदी नकोच, असे भारताचा नागरिक या नात्याने आपल्याला वाटते. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल, असे कोणतेही कार्य त्यांनी केलेले नाही, असेही सेन यांनी म्हटले होते. मोदी यांच्या आर्थिक भूमिकेवरही सेन यांनी टीका केली.
भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या ज्वलंत प्रश्नाकडून मोदी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही मोठे पक्ष एकमेकांवर केवळ चिखलफेकच करीत आहेत, असे यादव यांनी म्हटले आहे. मोदी यांचे राष्ट्रीय पातळीवर आगमन झाल्यापासून ही नौटंकी सुरू झाली असल्याची टीकाही यादव यांनी केली.

Story img Loader