श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून केंद्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच सीबीआयकडे देण्यासंदर्भातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याची मागणी योग्य नसल्याचं मत व्यक्त करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. तसेच आपण हे प्रकरण दुसऱ्या तपास यंत्रणेच्या हाती देण्याचे निर्देश देणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी तपास सुरु आहे त्या ठिकाणी प्रसारमाध्यमे आणि सर्वसामन्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यामुळे पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यात आहे, असा युक्तिवाद हे प्रकरण पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत करण्यात आलेलं.
या याचिकेला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. दिल्ली पोलिसांनी ८० टक्के तपास पूर्ण झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. “८० टक्के तपास झाला आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत,” असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आज साकेतमधील न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आफताब या सुनावणीला उपस्थित होता. या सुनावणीदरम्यान आफताबच्या पोलीस कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. आज आफताबला दिलेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती. त्यापूर्वीच आज पुन्हा एकदा यात चार दिवसांनी वाढ करण्यात आली.
आफताबची नार्को चाचणी करण्याची परवानगी यापूर्वीच साकेत जिल्हा न्यायालयाने दिली आहे. मात्र पहिल्या पाच दिवसांमध्ये आफताबची नार्को चाचणी करण्यात आली नाही. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधातील पहिल्या सुनावणीदरम्यान वकिलांच्या एका गटाने गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळेच आजची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठेवण्यात आल्याचं समजतं. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान साकेत जिल्हा न्यायालयातील सुमारे १०० वकिलांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.