शेअर बाजार उघडताच घसरणीला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. गुरूवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १००० अंकांपर्यंत घसरला. दुसरीकडे, निफ्टीलाही २५० अंकांपर्यंत फटका बसला. सकाळी १० वाजता सेन्सेक्स ८५७.३५ अंकांनी म्हणजेच १.५९ टक्क्यांनी घसरून ५३,२३१.०४ अंकांच्या स्तरावर व्यवहार करत होता. तर निफ्टी २६६.८० अंकांनी म्हणजेच १.६५ टक्क्यांनी घसरून १५,९००.३० या स्तरावर होता. दुसरीकडे, अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी पुन्हा नवीन विक्रमी नीचांकी गाठला. रुपया सुरुवातीच्या व्यापारात ३० पैशांनी घसरून ७७.५५ वर आला.
निफ्टीवर पीएसयू बँक निर्देशांक ३ टक्क्यांनी घसरला होता. पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक नुकसान झाले. निफ्टीमध्ये मेटल, फायनान्स आणि ऑटो समभाग २-२ टक्क्यांनी घसरले.
सेन्सेक्सच्या ओपनिंगमध्ये पॉवरग्रिड वगळता बाकीचे सर्व शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत होते. अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना सुरुवातीच्या व्यवहारात फटका बसला. टाटा मोटर्स, सुंदरम फास्टनर्स, एमअँडएम यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्यामुळे बीएसई ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी घसरला होता.