पाकिस्तानात उद्भवलेले ऊर्जासंकट आणि पेट्रोलचा अतीव तुटवडा यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दाव्होस येथे सुरू असणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीस दांडी मारावी लागली आहे. गेले दहा दिवस पाकिस्तानात पेट्रोल आणि पेट्रोलियम इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. या तुटवडय़ामुळे देशभरात अनेक ठिकाणी निषेध मोर्चेही काढले गेले होते.
गुरुवारी पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत देशातील पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थाच्या साठय़ात गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत वाढ झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या बैठकीच्या अनिवार्यतेमुळे शरीफ यांना दाव्होस येथील बैठकीला मात्र उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. देशाच्या सर्वच भागांत पेट्रोलचा पुरवठा सुरळीतपणे आणि सुलभतेने व्हावा यासाठी योग्य तो समन्वय सरकारी यंत्रणांनी राखावा, अशा सूचना शरीफ यांनी दिल्या.
देशातील पेट्रोलसाठय़ाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, याविषयी जनसामान्यांना सर्व ती माहिती दिली जावी. यात पारदर्शकता असावी, अशा सूचनाही पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच साठेबाजीवरही योग्य पद्धतींनी नियंत्रण ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीस, अर्थमंत्री इशक दार, जल आणि ऊर्जामंत्री ख्वाजा आसिफ आणि अन्य संबंधित अधिकारी हजर होते. आगामी दोन महिन्यांतील पेट्रोलची मागणी आणि पुरवठा यांच्या बदलत्या समीकरणांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा