पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे ठरविल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र नव्या सरकारने शरीफ यांच्याशी सीमेपलीकडील दहशतवाद, २६/११ हल्ल्याच्या खटल्याचा मंदावलेला वेग आणि दाऊदला भारताच्या हवाली करणे आदी प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नवाझ शरीफ यांनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले ही आनंदाची बाब आहे, दोन देशांमधील नव्या संबंधांची ही नांदी आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार हे भारताचे शेजारी आहेत, शेजारी कधीही बदलत नाहीत, असेही जावडेकर म्हणाले.
काँग्रेसचा सावध पवित्रा
शरीफ यांनी निमंत्रण स्वीकारण्याच्या मुद्दय़ावर काँग्रेसने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्रितपणे सुरू ठेवता येत नाही, असे मत भाजपने सातत्याने व्यक्त केल्याचे स्मरण या वेळी मावळते मंत्री मनीष तिवारी यांनी करून दिले आहे.
नव्या सरकारने कारभार स्वीकारल्यावर ते २६/११ च्या खटल्याची सुनावणी मंद गतीने सुरू असल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करतील, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे हफीझ सईचा प्रश्नही मांडला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याला पाकिस्तानने आश्रय दिला असल्याचे गेल्या १० वर्षांपासून भाजप सातत्याने सांगता आला आहे. त्यामुळे शरीफ भारतात येतील तेव्हा भाजप त्यांच्यासमवेत या प्रश्नावरही चर्चा करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दहशतवादाची केंद्रे आणि दाऊद दोघेही पाकिस्तानात अद्याप सक्रिय आहेत, त्यामुळे मोदी यांनी देशहिताशी तडजोड करू नये, असे काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी म्हटले आहे.
‘भारतीय लोकशाहीची ताकद दाखविण्यासाठी ‘सार्क’ देशांना निमंत्रण’
भारतातील लोकशाही किती बळकट आहे त्याची प्रचीती यावी यासाठीच सार्क देशांच्या प्रमुखांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या निमंत्रणाकडे परस्परांमधील प्रश्नांच्या लोलकातून पाहू नये, असे मत भाजपने व्यक्त केले आहे.पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण देण्यात आल्याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पाकिस्तानसमवेत चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही, असे मतही काही पक्षांनी व्यक्त केले. तर श्रीलंकेच्या अध्यक्षांना निमंत्रण देण्याचा फेरविचार करावा, अशी सूचना तामिळी पक्षांनी भाजपला केली होती.भारतीय लोकशाही किती सुदृढ आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी सार्क देशांच्या सर्व प्रमुखांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हा लोकशाहीचा समारंभ आहे. त्यामुळे त्याकडे परस्परांशी निगडित असलेल्या प्रश्नांच्या लोलकातून पाहू नये, असे भाजपचे नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
शाहबाज-लष्करप्रमुख चर्चा
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घेतला त्याबद्दल शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना विश्वासात घेतले आहे.
शाहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू असून ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रीही आहेत. शाहबाज यांनी राहील शरीफ यांची भेट घेतली आणि त्यांना नवाझ शरीफ यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारण्यासाठी शरीफ यांनी भारतात जाणे किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना राहील शरीफ यांना शाहबाज शरीफ यांनी दिली.शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने शरीफ हे लष्कराच्या दबावाखाली नाहीत ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात, हे स्पष्ट होते, असे पीएमएल-एनच्या नेत्याने सांगितले.