माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेस पक्षाने आता नेतृत्व म्हणून गांधी-नेहरु घराण्याच्या बाहेर विचार करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. जयपूर सांस्कृतिक महोत्सवात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे परखड मत व्यक्त केलं आहे. लोकसभेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. तरीही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे असंही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या आहेत.
काय म्हणाल्या शर्मिष्ठा मुखर्जी?
शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पक्षाचं देशातलं स्थान आजही निर्विवाद आहे. मात्र पक्षाला उभारी आणायची असेल, बळ द्यायचं असेल तर पक्षाच्या नेत्यांनी काम करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाने सदस्य मोहीम चालवली पाहिजे. तसंच पक्षातंर्गत निवडणुका घेऊन लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे. मोठे किंवा छोटे निर्णय यासंबंधी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यानंतर निर्णय घेतले पाहिजेत. माझे वडील प्रणव मुखर्जी यांनीही त्यांच्या डायरीत लिहिलं आहे की लोकांमध्ये जाऊनच काँग्रेसला मोठं व्हावं लागेल. जादूची छडी फिरवली आणि बळ मिळालं असं होणार नाही. असंही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.
२०१४ मध्ये २०१९ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात पराभव
काँग्रेसने एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर कुठल्याही पक्षात नेतृत्व बदल झालाच असता. भाजपात असं काही झालं असतं तर तिथेही नेतृत्व बदल झालाच असता. एकच नेता आपल्या पक्षाला हरवत आहे त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी चेहरा कोण असेल याचा विचार केला पाहिजे असंही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.
राहुल गांधींवर बोलणार नाही
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे तुम्ही एक नेता म्हणून कसं पाहता? हा प्रश्न विचारल्यावर शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या, “राहुल गांधींबाबत मी काही भाष्य करणार नाही. कुठल्याही एका व्यक्तीबाबत असं भाष्य वगैरे करता येत नाही. माझ्या वडिलांबाबतही मला ते सांगता येणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे.”
हे पण वाचा- प्रणब मुखर्जींचा राहुल गांधींवरील विश्वास कधी उडाला? मुलगी शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितला ‘तो’ प्रसंग
मला चिंता वाटते आहे की..
शर्मिष्ठा मुखर्जी पुढे म्हणाल्या, “मी काँग्रेसची समर्थक आणि जबाबदार नागरिक आहे. मी पक्षाबाबत चिंता वाटते आहे ती व्यक्त करते आहे. आता ही वेळ आली आहे की काँग्रेस पक्षाने नेहरु आणि गांधी घराण्यांच्या सीमेबाहेर जाऊन विचार केला पाहिजे. माझ्यावर कदाचित लोक विश्वास ठेवणार नाहीत पण मी काँग्रेसचीच कार्यकर्ता आहे. काँग्रेसने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसला हा विचार करावा लागेल की नेमकी आपली विचारधारा घेऊन आपण पुढे जात आहोत का? तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांचं पालन पक्षात खरंच होतं आहे का?”
मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला त्याचा अर्थ फक्त हा नाही की तुम्ही तुमच्या नेत्याची प्रशंसा करा. तुम्ही जर तुमच्या नेत्यांवर टीका केलीत तर लगेच तुम्हाला जसं काही आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं जातं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असाही प्रश्न शर्मिष्ठा मुखर्जी यांनी उपस्थित करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.