इस्रायलचे माजी पंतप्रधान व लष्करी कमांडर एरियल शेरॉन यांनी मध्यपूर्वेतील राजकारणाला नवीन दिशा दिली. युद्ध आणि राजकारण या दोन्ही पातळय़ांवर एकाचवेळी डावपेच लढवणाऱ्या या आक्रमक नेत्याच्या हयातीतील शेवटची आठ वर्षे रुग्णशय्येवर असहायपणे गेली. इस्रायलच्या जनतेमध्ये ‘मि. सिक्युरिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले शेरॉन अरब जगतात मात्र ‘बूचर’ (खाटिक) म्हणून हिणवले गेले.
शेरॉन यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक चढउतार आले तरी ते मागे हटले नाहीत. पॅलेस्टाइन व्याप्त प्रदेशात त्यांनी ज्यूंच्या वसाहती उभ्या केल्या व नंतरच्या काळात गाझा पट्टय़ातून नाटय़मय माघारीची घोषणाही केली. १९४८ मध्ये इस्रायल अस्तित्वात आला तेव्हापासून शेरॉन हे लष्करात कमांडर होते त्यांनी तेथे अनेक पदे भूषवली. १९५३ च्या युद्धात जॉर्डनमधून अतिरेक्यांनी हल्ले केले तेव्हा शेरॉन यांनी लष्कराच्या युनिट १०१ चे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. त्यानंतर १९६७ मध्ये ईजिप्तवरून झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात त्यांनी विजय संपादन केला. त्यांनी १९७३ मध्ये लष्करी सेवा सोडली व नंतर पुन्हा १९७३ च्या यॉम किप्पूर या मध्यपूर्व युद्धात सहभागी झाले. १९७७ मध्ये लिकूड पक्षाच्या स्थापनेनंतर त्याला सत्ता प्राप्त करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९८२ च्या लेबेनॉन युद्धात शरणार्थी शिबिरात जे हत्याकांड घडले त्यामुळे त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली. त्यावेळी ते मेनाशेम बेगिन यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते. नंतर २००१ मध्ये ते देशाचे निर्वाचित पंतप्रधान बनले. त्यांचे वजन जास्त असल्यामुळे त्यांना २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका येऊन ते कोमात गेले होते.
त्यांनी गाझा पट्टीतून घेतलेली माघार हा टीकेचा विषय ठरला कारण त्यानंतर तेथे हमास या पॅलेस्टिनी इस्लामी संघटनेचा अंमल सुरू झाला. पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यातील पन्नास वर्षांच्या संघर्षांचे ते साक्षीदार होते. त्यांनी अनेक युद्धे केली व कधीकधी माघारही घेतली, पॅलेस्टाइनशी संघर्ष केला व शांततेसाठी सहकार्याचा हातही पुढे केला. त्यामुळे पॅलेस्टिनी लोकही त्यांना विसरू शकले नाहीत.
अरब जगत अजूनही नाराज
गेली आठ वर्षे कोमात घालवल्यानंतर इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी शनिवारी तेल अवीव येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इस्रायलवर शोककळा पसरली तर पाश्चिमात्य राष्ट्रांनीही त्यांना आदरांजली वाहिली. मात्र, शेरॉन यांच्या निधनानंतरही अरब जगताने ‘क्रूरकर्मा’ गेला, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली.
शेरॉन यांच्या निधनानंतर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी खेद व्यक्त केला. ‘ते अतिशय थोर शासक आणि लढवय्ये होते’ असे ते म्हणाले. तर ‘इस्रायलच्या इतिहासातील महत्त्वाची व्यक्ति काळाच्या पडद्याआड गेली’ असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले.
पॅलेस्टाइनने शेरॉन यांच्या निधनावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ‘हा क्रूरकर्मा गेल्याने आमचा विजय सुकर झाला आहे,’ असे गाझामधील हमासचा प्रवक्ता सामी अबू झुहरी याने म्हटले.
मि. सिक्युरिटी अन् ‘खाटिक’
इस्रायलचे माजी पंतप्रधान व लष्करी कमांडर एरियल शेरॉन यांनी मध्यपूर्वेतील राजकारणाला नवीन दिशा दिली. युद्ध आणि राजकारण या दोन्ही पातळय़ांवर एकाचवेळी
First published on: 12-01-2014 at 01:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharon israels bulldozer in politics dies at