नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नारायण राणे, लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, नेते यशवंत जाधव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, पश्चिम बंगालमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी या नेत्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केलेल्या काही नेत्यांची यादी थरूर यांनी ट्वीट केली. ३०० कोटींच्या पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात नारायण राणे आरोपी होते, ते आता केंद्रात मंत्री आहेत. भाजपमध्ये गेल्यानंतर राणेंविरोधातील चौकशी थांबली. नारदा घोटाळय़ातील आरोपींमध्ये सुवेंदू अधिकारींचाही समावेश होता, ते भाजपमध्ये गेले, त्यांचीही चौकशी थांबली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा लाचखोरी प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चौकशी थांबवण्यात आली, असे ट्वीट थरूर यांनी केले आहे.
शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ५ वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. शिंदे गटातील नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव या दाम्पत्याची विदेशी मुद्रा प्रतिबंधक अधिनियमाच्या (फेमा) उल्लंघनप्रकरणी ‘ईडी’ने चौकशी सुरू केली होती. शिंदे गटात हे दाम्पत्य सामील झाले असून त्यांच्या चौकशीचे काय झाले? शिवसेनेतून (उद्धव ठाकरे गट) शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांची ‘ईडी’ने चौकशी सुरू केली होती. पण, या प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली, असे थरूर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.