पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याबाबत भाष्य केले आहे. थरूर यांनी काँग्रेस पक्षाचे सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष म्हणूनही वर्णन केले आहे. थरूर यांनी यापूर्वीही पक्षात बदल आणि सुधारणांची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. दरम्यान, काँग्रेस हा आजही प्रबळ विरोधक आणि पक्ष म्हणून सर्वात मजबूत पक्ष आहे, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे जी २३ गटाचे नेते शशी थरूर यांनी रविवारी राजकीय पक्षांच्या आमदारांच्या संख्येची माहिती दिली आहे.
“यामुळेच काँग्रेस सर्वात विश्वासार्ह राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. म्हणूनच सुधारणा आणि आणि बदल आवश्यक आहेत,” असे थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विधानसभा निकालांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही सुरू असताना थरूर यांनी हे वक्तव्य केले आहे. या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
शशी थरूर हे काँग्रेसच्या जी२३ नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांच्यासह एकूण २३ नेत्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट २०२० मध्ये, २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सक्रिय नेतृत्व आणि संघटनेत सर्वसमावेशक बदलांची मागणी केली. तेव्हापासून हे नेते चर्चेत असतात आणि जेव्हा-जेव्हा पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागते तेव्हा हे नेते आपली मागणी वारंवार करत राहतात.
“आता विचार करण्याची वेळ आली आहे”; काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीआधी वरिष्ठ नेत्याचे मोठे वक्तव्य
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समर्थन केले होते. राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूर्ण ताकदीने लढत आहेत, असेही गेहलोत म्हणाले.
ममतांनी आमचा पराभव करण्यासाठी भाजपाला मदत केली; तृणमूल काँग्रेसवर काँग्रेस संतापली
काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही – ममता बॅनर्जी
भाजपाविरोधात देशस्तरीय आघाडी उघडण्यास आपला पाठिंबा आहे. कुणी आम्हाला त्यात घेतले नाही तरी तशा प्रयत्नांना आमचा पाठिंबा राहील, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. यासाठी प्रादेशिक पक्षांना आता काँग्रेसवर अवलंबून राहता कामा नये. काँग्रेसची आताच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपाविरोधात ज्यांना उभे ठाकायचे आहे, त्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी काँग्रेसवर विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. पूर्वी काँग्रेसचा आपल्या संघटनेद्वारा सर्व देशावर ताबा होता. पण आता त्यांना यात स्वारस्य नाही, ते त्यांची विश्वासार्हकता गमावत आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
दरम्यान, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पंजाबमध्येही सत्ता गेली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पक्षाची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. निवडणुकीतील दारूण पराभवावर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली.