केरळ प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष के. सुधारन यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्याविरोधात वक्तव्य केलंय. शशी थरुर किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही सदस्याला पक्षाचे निर्देश नाकारण्याचा अधिकार नसल्याचं के. सुधाकरन म्हणालेत. तसेच त्यांनी सुधारकन यांनी थरुर हे काँग्रेसच्या निर्णयांच्या मर्यादेत नाही राहिले तर पक्षामधून त्यांची हकालपट्टी केली जाईल असंही म्हटलंय.
कन्नूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुधाकरन यांनी, “शशी थरुर हे पक्षामधील एक व्यक्ती आहेत. एक शशी थरुर म्हणजे काँग्रेस पक्ष नाही. ते पक्ष निर्णयाच्या मर्यादेत राहिले तर ते पक्षाचे सदस्य असतील. जर त्यांनी पक्षाचे निर्णय नाकारले तर त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल,” असा स्पष्ट इशाराच दिलाय.
केरळमधील ‘सेमी-हायस्पीड रेल्वे कॉरिडोअर’च्या विरोधात काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रावर थरुर यांनी सही करण्यास नकार दिला. त्यानंतर थरुर यांनी उघडपणे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचं कौतुक केलं. याच दोन कारणांमुळे सध्या थरुर यांना राज्यामधील स्वपक्षीय नेत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
आपल्याच पक्षातील नेत्यांकडून होत असणाऱ्या टीकेनेनंतर थरुर यांनी ट्विटरवरुन मत व्यक्त केलं होतं. काही मुद्द्यांबाबत राजकीय मतभेद दूर ठेवणं गरजेचं आहे, असं थरुर म्हणाले होते. तसेच केरळमधील सिलव्हर लाइन योजनेसंदर्भात अभ्यास केल्यानंतरच आपण आपलं मत मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुधाकरन यांनी पत्रकारांशी बोलताना, प्रत्येकाला आपली मत बनवण्याचा अधिकार आहे, असं म्हटलंय. “मात्र शशी थरुर असो किंवा सुधाकरन असो कोणालाही पक्षाचा आदेश नाकारण्याचा अधिकार नाहीय. पक्षाने असा अधिकार कोणालाच दिलेला नाही. अगदी खासदारांनाही हा अधिकार पक्षाकडून देण्यात आलेला नाही,” असं सुधाकरन म्हणाले.
थरुर यांनी सही करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचंही सुधाकरन म्हणाले. या लेखी स्पष्टीकरणानंतरच पुढील कारवाईबद्दल पक्ष निर्णय घेईल असंही सुधाकरन यांनी स्पष्ट केलं आहे.