सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी त्यांचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची दिल्ली पोलीसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. शशी थरूर रविवारी रात्री नवी दिल्लीला परतले असून, तपासासाठी पोलीसांना आवश्यक सहकार्य करणे आपले कर्तव्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
थरूर यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू असल्यामुळे गेले १५ दिवस ते गुरुवायूर येथे होते. आपली पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या मृत्यू प्रकरणाबद्दल पोलीस करत असलेला तपास कुठल्याही राजकीय दबावाशिवाय आणि पूर्वनियोजित निष्कर्षांविना व्यावसायिकरित्या व्हायला हवा, अशी मागणी थरूर यांनी केली आहे. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास ज्या रीतीने झाला आहे, त्याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न आणि चिंता असून, त्याबद्दल मी कालच दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. ते याबाबत तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करतील अशी मी आशा करतो, असे थरूर म्हणाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचे जे काही प्रश्न असतील, त्यांची उत्तरे देण्याची संधी लवकरात लवकर मिळण्याची मी वाट पाहात असल्याचे थरूर यांनी पत्रात म्हटले आहे. सुनंदाच्या मृत्यूमध्ये काही दगाफटका झाला असल्याचे आमच्या कुटुंबाला वाटत नसल्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाचा आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी शशी थरूर यांच्या चौकशीची शक्यता
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी त्यांचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची दिल्ली पोलीसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
First published on: 12-01-2015 at 12:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor likely to be questioned by police