नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेते शशी थरूर यांना पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे २२ वर्षांनंतर होणाऱ्या काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. 

सोनिया गांधी मायदेशी परतल्यानंतर, सोमवारी पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भातील सल्ला-मसलतींना वेग आला. सोनियांनी शशी थरूर यांच्यासह अन्य काही नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. विविध राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्यांमध्ये राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याची विनंती करणारे ठराव संमत झाले आहेत. त्यामुळे गांधी निष्ठावंतांकडून ‘सहमती’ने पक्षाध्यक्ष निवडीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, शशी थरूर यांच्या भेटीमध्ये सोनिया गांधी यांनी गांधी कुटुंबाकडून उमेदवार उभा केला जाणार नाही आणि पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये गांधी कुटुंब ‘तटस्थ’ असेल, असे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे शशी थरूर हे काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र, अजून थरूर यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली नाही.

हेही वाचा >>> सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते

पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ ते ३० सप्टेंबर असून छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, ओदिशा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू आदी प्रदेश काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पदासाठी पाठिंबा देणारे ठराव संमत केले आहेत. केंद्रीय निवडणूक विभागाने नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या पक्षाध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी व केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्य निवडीचे अधिकार देणारा दुसरा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. छत्तीसगड, केरळ व मध्य प्रदेशमधील प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधींना सर्वाधिकार देणारे ठराव संमत केले आहेत. प्रदेश काँग्रेस समित्यांमध्ये एकाचवेळी दोन ठराव मंजूर केले जात आहेत. या ठरावांद्वारे पक्षाध्यक्ष पदासाठी ‘सहमती’चा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न गांधी निष्ठावानांकडून होत होता. मात्र, सोनिया गांधी यांनी शशी थरूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊन हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

अशोक गेहलोत यांना पसंती?

गांधीतर नेत्याची पक्षाध्यक्षपदी निवड करायची असेल तर तीन प्रमुख बाबींचा विचार करावा लागणार आहे. नव्या पक्षाध्यक्षाला गांधी कुटुंबाच्या संपूर्ण पाठिंब्याने काम करावे लागेल. पक्षाध्यक्षाच्या जाहीर भूमिकेला गांधी कुटुंबातील सदस्यांनीही जाहीरपणे पाठिंबा द्यावा लागेल. नवा पक्षाध्यक्ष लोकांमध्ये मिसळणारा, संवाद साधणारा आणि संघटनात्मक व्यवस्थापनात मुरलेला असावा लागेल. याशिवाय, नव्या पक्षाध्यक्षाला अत्यंत महत्त्वाचे कामही करावे लागणार आहे. गेल्या आठ वर्षांत काँग्रेसकडे देणग्यांचा ओघ कमी झाला असून पक्ष चालवण्यासाठी निधीची कमतरता जाणवू लागली आहे. काँग्रेसकडे पुन्हा आर्थिक स्रोत वाढू शकेल यासाठीही नव्या पक्षाध्यक्षाला प्रयत्न करावे लागणार आहेत. हे तीनही निकष राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पूर्ण करत असल्यामुळे शशी थरूर यांच्याविरोधात गेहलोत यांना पसंती दिली जाऊ शकते, असे सुतोवाच पक्षातील ज्येष्ठ नेत्याने केले.

Story img Loader