सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांचे पती व काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा लवकरच जवाब नोंदवेल, असे संकेत दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी शुक्रवारी दिले.

या प्रकरणात शशी थरूर यांची चौकशी केली जाईल काय, असे पत्रकारांनी विचारले असता बस्सी म्हणाले की, या प्रकरणातील ज्या महत्त्वाच्या व्यक्तींची आम्हाला चौकशी करायची आहे, ती येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. एसआयटी ती लवकर करेल, असे मला वाटते.
जवळजवळ एक वर्ष जुने झालेले पुष्कर यांच्या व्हिसेऱ्याचे नमुने आतापर्यंत खराब झाले असतील आणि ते तपासणीसाठी विदेशात पाठवले तरी पुष्कर यांचा मृत्यू कुठल्या प्रकारच्या विषामुळे झाला हे निदान होऊ शकणार नाही, हे म्हणणे बस्सी यांनी नाकारले. हे नमुने ‘प्रिझव्‍‌र्हेटिव्ह्ज’सोबत ठेवण्यात आले असल्याने ते निश्चित टिकून राहणार आहेत.
सँपलिंग करताना ते कशा रीतीने ठेवण्यात आले याबाबत काही तक्रार नसेल, तर ते खराब होणार नाहीत असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
एसआयटीने आतापर्यंत अनेक व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यांना काय आढळले, हे जाहीर करण्यास बस्सी यांनी नकार दिला. ५१ वर्षे वयाच्या सुनंदा पुष्कर या १७ जानेवारी २०१४च्या रात्री दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या सूटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या.

Story img Loader