आयपीएल वादाबाबत, तसेच पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूच्या विविध पैलूंबाबत तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची गेल्या चार आठवडय़ांत आज दुसऱ्यांदा चौकशी केली.
एटीएसने दक्षिण दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात दोन सत्रांमध्ये मिळून सुमारे साडेचार तास चौकशी केली. दुपारच्या सत्रात पथकाने थरूर यांचे वाहनचालक बजरंगी यांचीही चौकशी केली.
थरूर हे परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री असताना २०१० सालच्या सुरुवातीला आयपीएलबाबत झालेल्या वादासंदर्भात थरूर यांना अनेक अवघड प्रश्न विचारण्यात आले. थरूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ७० कोटी रुपये आयपीएलमधील कोची चमूच्या फ्रँचाइझीला, पर्यायाने पत्नी सुनंदा यांना दिले असा आरोप आहे.
थरूर यांनी मात्र हा आरोप नाकारला आहे.
पाच सदस्यांच्या एसआयटी पथकाने दक्षिण दिल्लीतील अँटी ऑटो थेफ्ट स्क्वाडच्या (एएटीएस) कार्यालयात थरूर यांना प्रश्न विचारले. यापूर्वी १९ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. थरूर व सुनंदा या दोघांचेही मित्र असलेले संजय दिवाण, गंगाराम हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ रजत मोहन, थरूर यांच्या घरचे नोकर नारायण सिंग आणि त्यांचे स्वीय सहायक प्रवीण कुमार यांचीही पथकाने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader