महाराष्ट्रातले दिग्गज नेते ही शरद पवार यांची ओळख आहे. मात्र सध्या त्यांच्या पक्षाची दोन शकलं झाली आहेत. पक्षाचा मोठा भाग अजित पवार त्यांच्यासह घेऊन गेले आहेत आणि राष्ट्रवादी हा त्यांचाच पक्ष आहे हे देखील त्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव देऊन ठरवून टाकलं आहे. दुसरीकडे शिवसेनाही राष्ट्रवादीच्या एक वर्ष आधी फुटली आहे. या सगळ्यानंतर काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आहे जे विलीनीकरणाबाबत आहे.

काय म्हणाले शरद पवार?

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष एकत्र येतील आणि काँग्रेसमध्ये विलीन होतील. असं वक्तव्य शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. पुढच्या दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसशी जवळीक साधतील किंवा त्यातले काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेसमध्ये विलीन होणं हा चांगला पर्याय आहे असं काही पक्षांना वाटू शकतं. आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या विचारधारा गांधी-नेहरु यांच्या विचारांवर वाटचाल करत आहेत असं शरद पवारांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावरुन विविध चर्चांना उधाण आलं. ४ जूननंतर शरद पवार त्यांच्याकडे उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का? याचीही चर्चा झाली. या चर्चांवर आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार”; शरद पवार असे का म्हणाले? खरंच हे शक्य आहे का?

शशी थरुर काय म्हणाले आहेत?

“सध्या आम्ही वेगळे पक्ष आहोत. मात्र इंडिया आघाडीत आम्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत. भविष्यात काय होतं ते पाहू. मात्र काँग्रेस सोडून जे लोक गेले आहेत ते परतत असतील तर आम्ही स्वागत करु त्यांचं. एकच पक्ष नाही, देशात अनेक पक्ष आहेत जे काँग्रेसमध्ये होते आणि काही कारणांमुळे वेगळे झाले ते परतणार असतील तर आम्ही रेड कार्पेट टाकून स्वागत करु. कारण आम्हाला वाटतं की विचारधारा एकच असेल तर वेगळं कशाला राहायचं?” असं थरुर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस बाबत काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांना जेव्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की याबाबत मी माझ्या पक्षातल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. पुढच्या काळातले निर्णय आणि रणनीती हे सामूहिकपणे विचार करुन घेतले जातील. मात्र आम्हाला नरेंद्र मोदींशी जुळवून घेणं कठीण आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जे येत असतील त्यांचं रेड कार्पेट घालून स्वागत करु असं थरुर म्हणाले आहेत याबाबत शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader