Shashi Tharoor Meets Piyush Goyal : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरम येथून चार वेळा लोकसभेवर निवडून जाणारे खासदार शशी थरूर हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. तसेच त्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट प्रश्न विचारला आहे की “पक्षात माझं नेमकं स्थान काय? माझ्यावर नेमकी कोणती जबाबदारी आहे?” दरम्यान, थरूर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची प्रशंसा केली होती. तसेच त्यांनी केरळमधील डाव्या पक्षाच्या धोरणांचं कौतुक केलं होतं. काँग्रेसने आपल्या धोरणांमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केलं पाहीजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर “काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे पर्याय आहेत”, असंही त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर सीपीआयएमचे नेते थॉमस इस्साक यांनी शशी थरूर यांना त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीत येण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर आम्ही थरूर यांना एकटं पडू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, काँग्रेसबरोबर अंतर्गत संघर्ष चालू असतानाच शशी थरूर यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियूष गोयल यांच्याबरोबर एक सेल्फी काढून तो समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. यामध्ये थरूर व गोयल यांच्याबरोबर ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स देखील आहेत. थरूर यांनी हा सेल्फी शेअर करत म्हटलं आहे की “जोनाथन व गोयल यांच्याबरोबर चांगली चर्चा झाली”. थरूर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बाजूला पडलेली एफटीए चर्चा पुन्हा सुरू होत असल्याचं स्वागत केलं.
…म्हणून मी पंतप्रधान मोदी व केरळ सरकारचे कौतुक केले : थरूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचे कौतुक केल्याप्रकरणी शशी थरूर अलीकडेच स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते, मी माझी मते रोखठोकपणे मांडत आलो आहे. मग ती देशाच्या विकासासंदर्भात असतील किंवा केरळसंदर्भात असतील. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबतीत लहान विचार करून चालणार नाही. त्यामुळेच मला जे चांगलं वाटतं, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना.
थरूर यांनी पक्ष सोडण्याची आवश्यकता नाही : काँग्रेस
थरूर यांच्या नाराजीबद्दल काँग्रेसचे केरळमधील नेते के. एम. मुरलीधरन म्हणाले, “थरूर यांना काँग्रेस पक्षाबाबत काही अडचण असेल तर ती पक्षाअंतर्गतच सोडवली पाहीजे. पक्षाला सोडण्याची गरज नाही”.