काँग्रेसचे खासदार शशी थरूर अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. कधी आपलं इंग्रजी तर कधी महिला खासदारांबरोबर काढलेल्या सेल्फीमुळे, ते कधी कौतुकाचा, तर कधी वादाचा विषय ठरले आहेत. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यामुळेही ते चांगलेच चर्चेत आले होते. नुकतंच शशी थरूर यांनी ‘इंडिया टीव्ही’च्या लोकप्रिय अशा ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी शशी थरूर यांना बरेच धारदार आणि थेट प्रश्न विचारले. शशी थरूर यांनीही त्या प्रश्नांची चोख उत्तरं दिली. याबरोबरच सध्याच्या राजकारणावरही शशी थरूर यांनी त्यांचे स्पष्ट विचार मांडले. अटलबिहारी वाजपेयी ज्या प्रकारे जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलायचे तसं चित्र सध्याच्या राजकारणात पाहायला मिळत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा : तुम्ही एवढे सुंदर, बुद्धीमान कसे? महिलेच्या प्रश्नाला शशी थरूर यांचे हटके उत्तर; म्हणाले, “तुम्ही तुमच्या…”

त्यांच्या या वक्तव्यावर रजत शर्मा म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत म्हटलं जायचं की चांगली व्यक्ती आहे पण चुकीच्या पक्षात आहे, तसंच तुमच्या बाबतीतही बोललं की जातं की चांगला माणूस आहे, उच्चशिक्षित आहे पण चुकीच्या पक्षात आहे असं का?” रजत शर्मा यांच्या या प्रश्नावर हंशा पिकला.

या प्रश्नाचं उत्तर देताना शशी थरूर म्हणाले, “खरं सांगायचं झालं तर मी अत्यंत विचारपूर्वक हा पक्ष निवडला. तुम्ही माझं आधीचं लिखाण किंवा पुस्तकं वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी सगळ्यांवर टीका केली आहे, अगदी काँग्रेसवरही, पण नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारने उदारीकरणाच्या माध्यमातून जो बदल घडवून आणला, त्यानंतर माझ्या विचारात बदल झाला. मी कॉंग्रेसच्या कार्यप्रणालीवर जे आरोप केले होते ते खोडून निघाले.”

पुढे शशी थरूर म्हणाले, “यानंतर जेव्हा भाजपाने हिंदुत्वाच्या नावावर आपल्यात फूट पाडायला सुरुवात केली. त्या वेळी मला असं वाटलं की आपल्या देशाच्या एकतेसाठी कॉंग्रेसचं राजकारणच चांगलं आहे. प्रत्येकाला केवळ भारतीय म्हणूनच वागणूक मिळेल, हा विचार मला पटला आणि यामुळेच मी काँग्रेसमध्ये यायचा निर्णय घेतला.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor speaks about why he joined congress in aap ki adalat avn