लव्ह जिहादच्या संशयावरून उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. यावरून येथील अल्पसंख्याक समुदायाने मुस्लिमांच्या दुकानाबाहेर दुकाने रिकामे करण्याचे पोस्टर्स लावले आहेत. एक अल्पवयीन मुलगी मुस्लिम समाजाच्या पुरुषासोबत पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. त्यामुळे अल्पसंख्यांक समुदायाने हा पवित्रा घेतला आहे. याविरोधात काँग्रेस नेते शशी थरुर यांनी संताप व्यक्त केला आहे.
“लव्ह जिहादींनी त्यांची दुकाने रिकामी न केल्यास त्यावेळेनुसार निर्णय घेऊ”, अशी धमकी देणारे पोस्टर मुस्लिम समाजातील नागरिकांच्या दुकानाबाहेर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. हे पोस्टर्स कोणी लावले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच काँग्रेस नेते शशी थरुर यांनी संताप व्यक्त करत आपण निर्माण केलेल्या भारताची गांधींना लाज वाटेल असं ते म्हणाले.
“हे भयानक आहे. आपण निर्माण केलेल्या भारताची गांधीजींना लाज वाटेल”, असं ट्वीट शशी थरुर यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
एक अल्पवयीन मुलगी दोन पुरुषांसोबत पळून जात असताना त्यांना २७ मे रोजी पकडण्यात आले. त्यामुळे उत्तरकाशी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. या दोघांपैकी एकजण मुस्लिम असल्याने त्याच्यावर रहिवाशांनी लव्ह जिहादचा आरोप केला आहे. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत या दोघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, संतापलेल्या लोकांनी मुस्लिमांच्या दुकानाबाहेर पोस्टर लावले. रविवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले असल्याचा अंदाज आहे. “या परिसरात मुस्लिम समाजातील लोकांच्या मालकीची ३० ते ३५ दुकाने आहेत. या सर्व दुकानांबाहेर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ही पोस्टर्स स्थानिकांनीच लावली असल्याचा अंदाज आहे, कारण कोणती दुकाने मुस्लिमांची आहेत हे त्यांनाच माहीत आहे. येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि ज्यांनी शहर सोडले त्यांच्यापैकी कोणीलाही परत येण्याची इच्छा नाही,” मुस्लिम समाजातील एका दुकान मालकाने असे सांगितले. त्याच्याही दुकानाबाहेरही हे पोस्टर होते.
हेही वाचा >> “दुकाने रिकामी करा, अन्यथा…”, ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून उत्तरकाशीत ३५ मुस्लीम दुकानदारांना धमकी
नोटीसमध्ये काय लिहिलं आहे
“लव्ह जिहादींना कळवण्यात आले आहे की त्यांनी १५ जून, महापंचायतीपूर्वी त्यांची दुकाने रिकामी करावीत. जर तुम्ही हे केले नाहीतर त्यावेळेनुसार आम्ही निर्णय घेऊ”, असे पोस्टर लावण्यात आले आहे. ज्यात देवभूमी रक्षा अभियानाचाही उल्लेख आहे.