भाजप आमदार आणि प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमारांनी त्यांच्या प्रगतीशील धोरणांमुळे लोकप्रियता प्राप्त केली असल्याचे देखील ते म्हणाले. नितीश कुमारांची जेडीयूच्या अध्यक्षपदी निवड हा त्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी योग्यवेळी त्यांची निवड करण्यात आली असून, देशपातळीवरील राजकारणातील त्यांच्या भूमिकेबाबत खूप आशा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बिहारमधील दारूबंदी हे ऐतिहासिक पाऊल असून, अशाप्रकारचा निर्णय घेणारे नितीश कुमार हे देशातील पहिले मुख्यमंत्री असल्याचे सांगत शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांच्या दारूबंदी निर्णयाचे कौतुक केले. यासाठी त्यांनी नितीश कुमार यांचे आभारदेखील मानले. याआधीदेखील अनेकवेळा शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षाकडून दूर ठेवण्यात आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमार आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांची अनेकवेळा भेट घेतल्याने भाजपवर नामुष्की ओढवली होती. असे असले तरी जेडीयू आणि राजदच्या या दोन प्रमुख नेत्यांशी जवळीक ठेवणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी भाजप हा आपल्यासाठी पहिला आणि शेवटचा पक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, अलिकडेच पाटणा येथे पार पडलेल्या ‘एनिथिंग बट खामोश’ या शत्रुघ्न सिन्हांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजपचा कोणीही स्थानिक नेता उपस्थित नव्हता, पण नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांची आवर्जुन उपस्थिती होती. यावरून शत्रुघ्न सिन्हा यांचे पक्षाच्या सथानिक नेत्यांबरोबर मतभेद असून, त्यांच्यात अद्याप दरी कायम असल्याचे निदर्शनास येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा