बिहार विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत लाथाळ्यांना सुरुवात झाली आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या टीकेला अभिनेते, भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. हत्तीवर हजार कुत्रे भुंकतात, पण तो शांत आणि अविचल चालत असतो, असे सिन्हा यांनी ट्वीट केले आहे.
बैलगाडी आपल्या चाकांवरच चालत असते, पण तिच्या मधोमध चालणारा कुत्रा ती स्वत:च ओढत असल्याच्या आविर्भावात चालत असतो, अशी प्रखर टीका विजयवर्गीय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर केली होती.
यावर सिन्हा यांनी ट्वीट करताना सर्वच पक्षांतील छोटय़ा-मोठय़ा नेत्यांना माझे इतकेच सांगणे असेल की, ‘हाथी चले बिहार; भौंके हजार’..
पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे ‘बिहारी बाबू’ म्हणून राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाबद्दल त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली, तर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांची स्तुती केली. त्यामुळे भाजप नेत्यांची मोठी अडचण झाली होती. सिन्हा यांनी बिहारमधील ज्येष्ठ नेत्यांवर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अमर्यादित’ वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. बिहार निवडणूक राष्ट्रीय पातळीवरून लढविण्याचा भाजपचा निर्णय पक्षाच्या मुळावर आला. केंद्रीय नेतृत्वाने राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडलेला नव्हता. यासाठी राज्यातील काही अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांचा विचार होऊ शकला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शत्रुघ्न सिन्हा यांनी महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नितीशकुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते.