भारतीय जनता पक्षाने आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकण्यात आले. मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण नसल्याचे भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि राज्यातील कोणत्याही नेत्याने या कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण दिले नसल्याचे सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा पाटणा येथून भाजपचे खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. स्थानिक खासदार असूनदेखील ठिकठिकाणी लागलेले बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सवर आपले नाव अथवा छायाचित्र झळकले नसल्याची खंत त्यांनी मुंबईतून आपल्या घरून फोनवर संवाद साधताना बोलून दाखविली. कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने आपण यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राधामोहन सिंह, राजीव प्रताप रुडी आणि गिरीराज सिंग त्याचबरोबर सुशीलकुमार मोदी आणि नंदकिशोर यादव यांच्यासारखे राज्यातील नेतृत्व या कार्यक्रमास उपस्थित होते.
बॉलिवूडमधील कारकीर्दीच्या सर्वोच्च पातळीवर असताना आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाचे निष्ठावान सदस्य असल्याचे सांगत पक्षाला बाधा पोहोचविण्याचा विचार स्वप्नातदेखील आपल्या मनाला शिवत नसल्याचे  सिन्हा म्हणाले.
राज्यपातळीवरच्या अनेक नेत्यांना आपल्या व्यक्तिमत्वाचे भय वाटते. माझ्या उपस्थितीमुळे ते दुर्लक्षित होऊ नयेत म्हणून आपल्याला या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. त्यांनी कोणाचेही नाव घेण्याचे टाळले.
भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हांना वगळून बिहार विधानसभेची निवडणूक पक्षाला जिंकता येईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पक्षाला शुक्षेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या बॅनर्स आणि पोस्टर्सवर सिन्हा यांचे नाव नसल्याचे लक्षात आणून देताच, हे बॅनर्स आणि पोस्टर्स पक्षाने लावलेले नसून व्यक्तिगत असल्याचे सांगत सुशीलकुमार मोदी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आपल्या पक्षाच्या प्रसिद्ध नेत्याची काळजी न वाहणारा पक्ष जनतेची काय काळजी वाहणार, असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संधीचा फायदा घेत भाजपवर प्रहार केला.