बिहारमधील भाजपच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा मोदी-शहांच्या वर्चस्वाला आव्हान देत ‘खऱ्याला खरे म्हणणे ही जर बंडाळी असेल, तर मी बंडखोर आहे,’ असे सांगून दिल्ली, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात पक्षाचा पराभव झाला तेव्हा अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. आता मी एक ‘गरीब आणि शरीफ’ तेवढा कारवाईसाठी उरलो काय? असा सवाल करून संभाव्य पक्ष कारवाईबाबत त्यांनी भाष्य केले. नागपुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.
बिहार निवडणुकीच्यावेळी डाळीचे वाढलेले दर कमी करा, पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान करा आणि बिहारी आणि बाहरी हा मुद्दा निकाली काढा, असे म्हणालो. नेतृत्त्वाने याकडे लक्ष दिले असते तर लाभ झाला असता, परंतु प्रचारासाठी दुरून नेते आयात करण्यात आले. बराच पैसा, ऊर्जा खर्च केली. दिल्लीतही असेच घडले होते. आम्ही यातून काही धडा शिकणार आहोत की नाही? बिहारमधील पराभव हा पक्षाचा शेवटचा पराभव ठरला पाहिजे, असे मला वाटते. यात गैर काय आहे? पक्ष आणि जनहिताच्या गोष्टी बोलणे चुकीचे आहे काय? आता पक्षातील ज्येष्ठ बोलू लागले आहेत. मी दूर उभा राहून काय घडते आहे, हे बघत राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2015 रोजी प्रकाशित
खऱ्याला खरे म्हणणे बंडाळी असेल, तर मी बंडखोर – शत्रुघ्न सिन्हा
बिहारमधील पराभव हा पक्षाचा शेवटचा पराभव ठरला पाहिजे, असे मला वाटते.
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 16-11-2015 at 11:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughna sinha once again criticized bjp leaders