Bareilly Suicide Case : वैवाहिक वादातून किंवा जोडीदाराच्या छळवणुकीला वैतागून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर येत असताना आता उत्तर प्रदेशातील बरेलीतूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बरेलीच्या इज्जतनगर भागातील एका २४ वर्षीय तरुणाने वैवाहिक वादातून घरी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राज आर्य असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याने बुधवारी त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, त्याची पत्नी सिमरन (२३) हिच्या छळाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सिमरनसोबत त्याने एप्रिल २०२४ मध्ये प्रेमविवाह केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी हे जोडपे खाजगी कंपन्यांमध्ये काम करत होते. परंतु, नुकताच दोघांचीही नोकरी गेली होती. महत्त्वाचे म्हणजे या जोडप्याला अवघ्या ४५ दिवसांपूर्वीच एक मुलगी झाली. कुटुंबातील सदस्यांनी पीटीआयला सांगितले की, राज आणि सिमरनमध्ये काही काळापासून तणाव निर्माण झाला होता. १० दिवसांपूर्वी एका गंभीर वादातून सिमरन तिच्या माहेरी निघून गेली होती.
पत्नीच्या दोन इन्स्टाग्राम पोस्ट्स
बुधवारी सकाळी, सिमरनने इन्स्टाग्रामवर दोन स्टेटस अपडेट्स पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एका पोस्टमध्ये, तिने तिच्या पतीविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्याचा दावा केला आहे. यामध्ये लिहिले आहे की “तो सकाळी १०:३० पर्यंत तुरुंगात असेल.” त्यानंतरच्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “आता तुरुंगात जा.” त्यानंतर आर्यने आत्महत्या केली. या इन्स्टाग्राम पोस्ट्सबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
“आई, मी कायमचा झोपी जातोय”
“आई, मी कायमचा झोपी जातोय”, असं तो आपल्या आईला आत्महत्येआधी म्हणाला होता. परंतु, त्याच्या आईला त्याच्या या वक्तव्याचा उद्देश, लक्षात आला नाही. कालांतराने तिला त्याच्या हेतुबद्दल शंका आल्याने ती तत्काळ आपल्या मुलाला पाहायला गेली. परंतु, तोवर आर्य छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मंडल अधिकारी अजय कुमार यांनी घटनेबाबत सांगितले की, कुटुंबाकडून औपचारिक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.