वडील आणि मुलगी हे एक असं नातं आहे, ज्या नात्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. ज्या वडिलांना पाहून घरातल्यांचा थरकाप उडतो, ज्यांचा घरातच नव्हे तर बाहेरही चांगलाच दरारा असतो अशा बाबांशी मुलींचं नातं म्हणजे एखाद्या मित्राप्रमाणे असतं. आहे की नाही ही गंमत. असंच एक नातं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. मुख्य म्हणजे वडील- मुलीच्या या नात्याची सोशल मीडियावरही बऱ्यापैकी चर्चा सुरु आहे.
ही चर्चा आहे पोलीस उपायुक्त ए.आर. उमामहेश्वर सर्मा आणि त्यांची मुलगी सिंधू सर्मा यांच्याविषयीची. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उमामहेश्वर हे पोलीस खात्यात सेवेत आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीनेही पोलीस खात्यात प्रवेश केला. पण, रविवारी ज्यावेळी वडील- मुलीची ही जोडी प्रत्यक्षपणे समोर आली तेव्हा मात्र पोलीस उपायुक्त असणाऱ्या उमामहेश्वर यांनी त्यांच्या मुलीला सलाम केला. त्यांची मुलगी म्हणजेच सिंधू सर्मा ही तेलंगाणातील जगतियाल भागात पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहते.
उमामहेश्वर हे पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. तर त्यांची मुलगी सिंधू ही २०१४ मध्ये इंडियन पोलीस सर्व्हिसअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या तुकडीतील विद्यार्थीनी होती. हैदराबादनजीक असणाऱ्या कोंगरा कालन येथे तेलंगाणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसच्या एका जाहीर सभेच्या वेळी ‘ऑन ड्युटी’ असतानाच वडील- मुलीची ही जोडी एकमेकांसमोर आली. आपण कामावर असताना पहिल्यांदाच मुलीच्या समोर आलो. हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता, अशी प्रतिक्रिया यावेळी उमामहेश्वर यांनी ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली. ती माझ्याहून वरिष्ठ आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा तिला ‘ऑन ड्युटी’ पाहीन तेव्हा तेव्हा तिला सलाम करेन. हा आमच्या कामाचाच एक भाग आहे. पण, घरी मात्र आम्ही अगदी सर्वसामान्य वडील, मुलीप्रमाणेच वावरतो, असंही ते न चुकता म्हणाले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची भावना स्पष्टपणे झळकत होती.