Meerut Murder Case: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूत नावाच्या इसमाची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. सौरभ राजपूत हे अमेरिकन कंपनीमध्ये काम करत होता. आपल्या मुलीच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त फेब्रुवारी महिन्यात सौरभ राजपूत दोन वर्षांनी लंडनहून परतले होते. ४ मार्च रोजी त्यांची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून त्यांची हत्या केली. तसेच त्यांच्या शरीराचे १५ तुकडे करून ते एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले.

आता मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिला जगण्याचा काहीही अधिकार नसून तिला फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रमोद कुमार रस्तोगी आणि कविता रस्तोगी यांनी दिली आहे. पालकांनी आपल्या मुलीला पाठिंबा देण्यास नकार दिला. आमचा जावई सौरभने मुस्कानवर मनापासून प्रेम केले. पण तिने त्याच्या प्रेमाची पर्वा केली नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आमच्यामुळेच तिला अटक

सौरभ राजपूत यांचा खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल दोघेही हिमाचल प्रदेशला फिरण्यासाठी गेले होते. तिथून आल्यानंतर तिने आई-वडिलांची भेट घेऊन सौरभची हत्या केली असल्याचे सांगितले. तिने मला येऊन सौरभची हत्या केल्याचे सांगितले, असे मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली. सौरभ खूप चांगला मुलगा होता, पण आमच्या मुलीमध्येच अडचण होती. तिने सौरभला त्याच्या कुटुंबियांपासून वेगळे केले आणि आता तिने हे असे कृत्य केले.

मुस्कानच्या पालकांनी सांगितले की, ते ठामपणे सौरभ यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळेच तिला अटक व्हावी म्हणून आम्ही पोलिसांना सर्व काही सांगितले. सौरभच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. सौरभने मुस्कानसाठी स्वतःचे कुटुंब पणाला लावले. संपत्तीवर पाणी सोडले. तो आमचाही मुलगा होता. पण मुस्कानने त्याचा जीव घेतला.

प्रियकरामुळे मुस्कानला अंमली पदार्थाचे व्यसन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्ला अंमली पदार्थांचे व्यसन करत होता. त्याने मुस्कानलाही या व्यसनाची सवय लावली होती. दोघेही भेटल्यानंतर अंमली पदार्थाचे सेवन करत असत. या व्यसनामुळेच तिला साहिलला सोडायचे नव्हते. सौरभ राजपूत याला विरोध करेल, या भीतीपोटी दोघांनी त्याला संपविण्याचा कट रचला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.