Bangladesh Prime Minister Sheikh Hasina Resign Dhaka and Leaves Dhaka: बांगलादेशमध्ये हजारोंच्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर उतरून तरुणांनी सरकारी निर्णयाचा व शेख हसीना यांच्या सरकारचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत होतं. अखेर आंदोलक थेट शेख हसीना यांच्या शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी देश सोडला आहे. आता त्या दिल्लीच्या दिशेनं निघाल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे त्यांच्यासाठी इतरही सुरक्षित ठिकाणं असताना त्या भारताच्या आश्रयाला पुन्हा येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय घडतंय बांगलादेशमध्ये?

बांगलादेशमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे. महिन्याभरापूर्वी बांगलादेश सरकारनं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील वीरांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकरीतील ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा हा निर्णय होता. तरुणांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाला आक्रमक विरोध केला. सरकारी सुरक्षा दलाशी त्यांची बाचाबाची झाली. प्रकरण हिंसाचारापर्यंत गेलं. या घटनेत अनेक तरुणांचा मृत्यू झाला. (Sheikh Hasina Resigned)

गेल्या महिन्याभरापासून कमी-अधिक प्रमाणात हा हिंसाचार चालूच होता. दरम्यानच्या काळात बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा थेट पाच टक्क्यांपर्यंत खाली आणली व त्यातील फक्त ३ टक्के जागा वीरांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश बांगलादेश सरकारला दिले. मात्र, यादरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी शेख हसीना यांना जबाबदार धरत बांगलादेशच्या जनतेनं त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन सुरू केलं. आंदोलकांना रोखण्यासाठी बांगलादेशात जमावबंदीही लागू करण्यात आली. पण आंदोलकांनी थेट राजधानी ढाक्यापर्यंत मोर्चा काढला. अखेर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला.

बांगलादेशमध्ये अस्थिरता, लष्करशाहीकडे वाटचाल? (फोटो – रॉयटर्स)

शेख हसीना भारताच्या वाटेवर?

दरम्यान, १९७५ प्रमाणेच शेख हसीना पुन्हा एकदा भारताच्या आश्रयासाठी येणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सुरक्षा यंत्रणा सी-१३० या हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवून आहेत. बांगलादेशच्या सीमेपासून हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत प्रवास करत असून दिल्लीच्या दिशेनं ते जात असल्याचं सांगितलं जात आहे. याच हेलिकॉप्टरमध्ये शेख हसीना व त्यांच्यासह त्यांचे काही पदाधिकारी, कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे.

Bangladesh Violence Sheikh Hasina Resigned: “आम्ही भारताला यासाठी माफ करू शकत नाही”, नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांचा संताप; म्हणाले, “माझ्या भावाच्या घरात…”!

१९७५ सालीदेखील शेख हसीना याचप्रकारे भारतात वास्तव्यासाठी आल्या होत्या. त्यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांची हत्या झाल्यानंतर त्या काही वर्षे भारतात वास्तव्यासाठी होत्या. साधारणपणे १९७९ पर्यंत शेख हसीना भारतात होत्या, त्यानंतर त्या बांगलादेशमध्ये परतल्या.

भारताचे बांगलादेशमधील माजी राजदूत म्हणतात…

दरम्यान, यासंदर्भात भारताचे बांगलादेशमधील माजी राजदूत हर्ष वर्धन श्रींगला यांनी भाष्य केलं आहे. “त्या नेमकं कुठे जातील हे सांगणं माझ्यासाठी कठीण आहे. शेख हसीना १९७५ ते १९७९ हा काळ भारतात होत्या. त्यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांची हत्या झाल्यानंतर त्या भारतात आल्या होत्या. भारतानं आपल्या शेजारी राष्ट्रांमधील नेत्यांना कधीही सुरक्षित आश्रय देण्यास नकार दिलेला नाही. पण मला असं वाटतं की शेख हसीना यांना सुरक्षित आश्रय घेण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे त्या नेमकं कुठे जातील? यावर आत्ताच भाष्य करणं कठीण आहे”, असं श्रींगला म्हणाले आहेत.