Sheikh Hasina says America toppled My Government : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केलं आहे. त्या सध्या भारतात असून त्यांनी बांगलादेशातील अराजकतेला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेनेच त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडल्याचं वक्तव्य केलं आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळे अमेरिकेने त्यांना सत्तेवरून हटवण्याची योजना आखली होती, असंही हसीना यांनी म्हटलं आहे. बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेट घेऊन तिथे नौदलाचं व लष्करी तळ उभारण्याची अमेरिकेची योजना होती. ज्याद्वारे अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर स्वतःचा प्रभाव निर्माण करता आला असता.
अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवं होतं, मात्र हसीना यांनी ते दिलं नाही. परिणामी अमेरिकेने त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय चाली खेळल्या आणि त्यात ते यशस्वी झाले, असं शेख हसीना यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माथ्यमातून पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे. इकोनॉमिक टाईम्सने हसीना यांचा हा संदेश प्रसिद्ध केला आहे.
शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये तरुणांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. दीड महिन्यापासून हे आंदोलन चालू असून दोन आठवड्यांपूर्वी या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. यामुळे बांगलादेशात अराजकता माजली. परिणामी शेख हसीना यांनी ४ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि ५ ऑगस्ट रोजी त्या बांगलादेशी वायूदलाच्या एका विमानाने भारतात आल्या. भारत सरकारने त्यांना सुरक्षित स्थळी ठेवलं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा बांगलादेशमधील घडामोडी व शेख हसीनांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत.
हे ही वाचा >> Bangladesh Crisis : “पिस्तुल रोखलं, बेड्या ठोकून वीजेचे झटके दिले”, BNP कार्यकर्त्यांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचाराची कहाणी
शेख हसीना नेमकं काय म्हणाल्या?
शेख हसीना यांनी म्हटलं आहे की मला माझ्या देशात मृतदेहांचे खच पाहायचे नव्हते म्हणून मी राजीनामा दिला. काही लोकांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर पाय ठेवून सत्तेत यायचं होतं, परंतु मी तसं हो दिलं नाही. मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. अमेरिका सेंट मार्टिन बेट मिळावं यासाठी प्रयत्न करतेय. मी त्या बेटाचं सार्वभौमत्व सोडलं असतं तर अमेरिका अगदी सहजपणे बंगालच्या उपसागरात त्यांचं वर्चस्व निर्माण करू शकली असती. परंतु, मी तसं होऊ दिलं नाही. मी देशातील जनतेला विनंती करते की काही कट्टरपंती तुमच्यी दिशाभूल करू पाहतायत, तुम्ही त्यांच्या राजकारणाला बळी पडू नका.