नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लंडनला जाऊन येथे राजकीय आश्रय मिळविण्याच्या हसीना यांच्या प्रयत्नांत ‘तांत्रिक अडचणी’ निर्माण झाल्याची माहिती असून ‘गरज पडेल तोपर्यंत’ त्यांना भारतात ठेवण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा >>> Sheikh Hasina : शेख हसीना यांचे पती होते शास्त्रज्ञ, मुलगी WHO ची संचालक, कुटुंबाविषयी या गोष्टी माहीत आहेत का?
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन हसीना हवाई दलाच्या विमानाने भारतात दाखल झाल्या. येथून त्या पुढे लंडनपर्यंत प्रवास करणार होत्या. मात्र आता या नियोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ब्रिटनच्या स्थलांतर कायद्यानुसार देशात दाखल होण्यापूर्वी कुणाला तात्पुरता आसरा देता येत नाही. एकदा ब्रिटनमध्ये आल्यानंतर असा आश्रय मागितला जाऊ शकतो. मात्र हसीना यांच्याकडे राजनैतिक पारपत्र किंवा अधिकृत व्हिसा नाही. त्यामुळे आधी व्हिसा मिळवून आणि नंतर लंडनला जाऊन त्यांना आश्रय मागावा लागेल. ही तांत्रिक अडचण सोडविण्याचा प्रयत्न लंडन आणि दिल्लीमधून केला जात असल्याचे समजते. मात्र सद्यास्थितीत त्या भारतात ‘सुरक्षित’ असून प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना येथेच शरण देण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याचेही समजते.