Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy : पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पलायन केलेल्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. भारताने त्यांचे आदरपूर्वक आदरातिथ्य केल्याने शेख हसीना यांच्या मुलाने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ पोस्ट करून भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
“शेख हसीना यांच्या सरकारने बांगलादेशात शांतता राखली, आर्थिक वाढ रोखली, बंडखोरी थांबवली आणि आपल्या उपखंडाचा पूर्व भाग स्थीर ठेवला. हे कोणीही नाकारू शकत नाही. याचे ट्रॅक रेकॉर्डही आहेत. आमचं एकमेव सरकार आहे, ज्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. इतर सरकारांनी अनेक प्रयत्न केले. परंतु ते अयशस्वी झाले”, असं शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय म्हणाले.
“भारत सरकारला माझा संदेश आहे, माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने त्वरित कारवाई केल्याबद्दल मी त्यांचे वैयक्तिक आभार मानतो. मी सदैव कृतज्ञ राहीन. माझा दुसरा संदेश असा आहे की भारताने जगात नेतृत्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे आणि इतर परकीय शक्तींना परिस्थितीवर हुकूम करू देऊ नये. कारण हा भारताचा शेजारी आहे. ही भारताची पूर्व बाजू आहे”, असंही सजीब वाझेद म्हणाले.
#WATCH | Washington, DC: Former Bangladesh PM Sheikh Hasina's son, Sajeeb Wazed Joy says, "My message to the government of India, is my personal gratitude to Prime Minister Modi for his government's quick action in saving my mother's life. I am eternally grateful. My second… pic.twitter.com/luXYynELey
— ANI (@ANI) August 9, 2024
“शेख हसीना बांगलादेशमध्ये मोस्ट वाँटेड”
दरम्यान, दुसरीकडे बीएनपी पक्षाचे प्रवक्ते अमिर खसरू मेहमूद चौधरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आत्ताच्या घडीला शेख हसीना या बांगलादेशमधील मोस्ट वाँटेड व्यक्ती आहेत. अनेक गुन्ह्यांसाठी त्यांची चौकशी होणं बाकी आहे. यात हत्या, लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे बांगलादेशच्या नागरिकांना असं वाटतं की भारत सरकारनं त्यांच्या भावनांचा विचार करावा. शेवटी दोन देशांमधील संबंध म्हणजे तिथल्या नागरिकांमधले संबंध असतात”, असं ते म्हणाले.