देशातील शिख आणि मुस्लिम समुदायाचा उल्लेख चुकून दहशतवाद्यांच्या रांगेत केल्याचा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे ही चूक दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केली नसून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या मध्य प्रदेश पोलीस खात्याकडूनच ही चूक झाल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तीव्र टीका केली जाऊ लागली. यानंतर संबंधित पोलीस अधिक्षकांनी माफी मागितली असून हा सगळा प्रकार आदेशाची प्रत तयार करणाऱ्या क्लार्कच्या ढिसाळपणामुळे झाल्याचं सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार मध्य प्रदेशमधल्या कटनी पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. या भागात मध्य प्रदेश सरकारमधील मंत्र्यांचा दौरा असल्यामुळे त्यासंदर्भात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृतीनिर्देश देणारं पत्रक कटनी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयातून काढण्यात आलं. या पत्रकामध्ये किती पोलीस कुठे आणि कसे नियुक्तीवर असतील, यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यासोबतच इतर सामान्य निर्देशांमध्ये ही चूक करण्यात आल्याचं समोर आलं. यामध्ये ‘शिख, मुस्लिम, जेकेएलएफ, उल्फा, सिमी आणि एलटीटीईच्या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवा’, असं नमूद करण्यात आलं होतं.

दरम्यान, या ऑर्डरचा फोटो व्हायरल होताच त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आले. काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी त्याबाबत तक्रार केली. “शिख, मुस्लिम समुदायाचा उल्लेख दहशतवाद्यांच्या सोबत करण्यात आला आहे का? कटनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात सरकारने तातडीने कारवाई करायला हवी. अन्यथा हा भाजपाचा अजेंडा असल्याचं बोललं जाईल”, असं सलुजा म्हणाले.

का घडली ही चूक?

दरम्यान, ही चूक नेमकी का घडली, याविषयी कटनीचे पोलीस अधीक्षक सुनील जैन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “ऑर्डर टाईप करताना ही चूक झाली आहे. संपूर्ण कटनी पोलिसांच्या वतीने मी या चुकीबद्दल माफी मागतो. असा प्रकार पुन्हा कधीही होणार नाही, याची मी काळजी घेईन. मी संबंधित क्लार्कला देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे”, अशी माहिती जैन यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikh muslim terrorist madhya pradesh katni sp order note viral apologizes pmw